गडचिरोली : गडचिरोली जिल्हय़ातील नक्षलवाद्यांविरोधात कार्यरत असलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या १० कंपन्या काश्मीरमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाल्याने राज्य राखीव पोलीस दल व सी-६० पोलिसांवरील ताण वाढणार आहे.
गडचिरोली जिल्हा हा दुर्गम, नक्षलग्रस्त असल्याने हिंसक घटनांची तेथे कायम भीती असते. नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र दिनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलिस ठार झाले होते. येथील सुरक्षा दलात वाढ केल्यानंतर नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात केंद्र, राज्य सरकारला यश आले होते. एका कंपनीत १३५ जवान असतात. यातील १० कंपन्या म्हणजेच १ हजार ३५० पोलीस येथून काश्मीरला हलविण्यात आले आहेत.
काश्मीरबाबतचे घटनेतील ३७०कलम हटवल्यानंतर तेथील सुरक्षा बळकट करण्यासाठी येथील १० कंपन्या काश्मीरला पाठवण्यात आल्या आहे. गडचिरोली जिल्हय़ात आवश्यक राखीव पोलीस असून राज्य पोलीस दलाने आणखी सुरक्षा दलाची मागणी केल्यास बटालियन परत येऊ शकतात, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.