Manoj Jarange Patil Hunger Strike Update : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण छेडलं आहे. अंतरवाली सराटीत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यातच, त्यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींवर (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) आरोप केले आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन षडयंत्र रचल्याचे ते म्हणाले आहेत. तसंच, हे माझं आता शेवटचं उपोषण असल्याचंही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ओबीसी नेते समजून घेत नाहीत. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही. ते उगीच तेढ निर्माण करत आहेत. काहीजण इथं प्रसिद्धीसाठी बसले आहेत. जिकडे मराठे आंदोलन करत आहेत, तिथंच त्यांनाही करायंच आहे. त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे. आणि आम्हाला जातीयवादी म्हणत आहेत.”
“हे सरकारचं जाणूनबुजून षडयंत्र आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना चांगलं समजत होतो. यापुढेही चांगलं समजत आहोत. आम्हाला कळतं सगळं. कोणाच्या गाड्या येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ओसडीने काय षडयंत्र रचले आहेत. काय डाव रचला आहे. हसून खेळून गोड बोलतील आणि कार्यक्रम प्रत्येकवेळी मराठ्यांचा लावतील”, असाही आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीवर केला आहे. तसंच ते मराठ्यांच्या अन्नात तेल ओतत असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.
“षडयंत्र रचून दिल्लीपर्यंत न्यायला लागले आहेत. कोण कुठे जातो, कोण कुठे उतरतो. विमानतळावर कोणाच्या गाड्या आहेत. कोण कोण सोबत आहेत, हे सर्व माहित आहे. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी लोकांना घेऊन दिल्ली पळत आहेत. तिकडून काय बनवून आणत आहेत माहीत नाही. माझ्या मराठ्यांना बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असे. हे षडयंत्र सरकार घडवून आणत आहे. ते काय बळीचे बकरे बनवत असतील”, असंही जरांगे म्हणाले.
उपोषण केव्हा थांबवणार?
मी मुख्यमंत्री शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगतो की त्यांनी मला आरक्षणाबाबत संपूर्ण माहिती द्यावी. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत, त्याला किती दिवस लागणार आहेत? ओबीसीतून आरक्षण देणार की नाही, सगेसोयऱ्यांची व्याख्या मान्य आहे की नाही ही सर्व माहिती फडणवीसांनी द्यावी. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही. सगळं क्लिअर झालं तर उपोषण स्थगित करायला काही अडचण नाही. तुम्ही असंच खेळत असाल तर हे माझं शेवटचं उपोषण असणार. मी काही मोकळा नाही, मी थेट विधानसभेच्या तयारीला लागणार”, असंही थेट मनोज जरांगे पाटील म्हणाले.