सावंतवाडी: केर (ता. दोडामार्ग) येथे काल, शुक्रवारी रस्त्याशेजारी निवांत बसलेल्या पट्टेरी वाघाच्या दर्शनामुळे सावंतवाडी-दोडामार्ग परिसरातील वन्यजीवनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी या घटनेच्या निमित्ताने वनविभाग आणि राज्यकर्त्यांच्या धोरणांवर गंभीर टीका केली आहे.
काही महिन्यांपूर्वी दाभीळ येथे वाघिणीचा बुडून झालेला मृत्यू, त्यानंतर खडपडे येथे वाघाचे दर्शन, चौकूळ परिसरात सातत्याने दिसणारा पट्टेरी वाघ आणि आता केर येथील ‘वाघ दर्शन’, या सगळ्या घटना सावंतवाडी-दोडामार्ग सह्याद्री पट्ट्यातील वन्यजीवनाची समृद्धी दर्शवतात. मात्र, या समृद्ध वाइल्डलाईफ कॉरिडोरमधून (वन्यजीव मार्गिका) शक्तीपीठ महामार्ग रेटून नेण्याचा राज्यकर्त्यांचा दुराग्रह हास्यास्पद आणि दुर्दैवी असल्याची टीका डॉ. परुळेकर यांनी केली आहे.
“महामार्ग काढणे घातक”:
आंबोली, गेळे, घारपी, फुकेरी, तांबोळी, असनिये, डेगवे या इको-सेन्सिटिव्ह (पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील) भागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून महामार्ग काढणे, हे येथील वन्यजीवनासाठी अत्यंत घातक असल्याचे डॉ. परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वन्यजीव मानवी वस्तीकडे:
या भागात आधीच विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू आहे. यामुळे गवे रेडे यांसारखे वन्यजीव सावंतवाडीसारख्या शहरांमध्ये पाळीव गाई-म्हशींसारखे भरदिवसा दिसू लागले आहेत. आता तर वाघही अनेक ठिकाणी दिसत आहेत. ही स्थिती भयावह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
‘वनतारा’वर टीका:
ओंकार हत्तीला अंबानींच्या ‘वनतारा’ (गुजरात) येथे पाठवण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार दीपक केसरकर करत आहेत. याच धर्तीवर, आता पट्टेरी वाघांनाही ‘वनतारा’मध्ये पाठवण्यासाठी आमदार प्रयत्न करणार काय? असा संतप्त सवाल डॉ. परुळेकर यांनी विचारला आहे.
ज्याप्रमाणे येथील लोकप्रतिनिधी सुरतला गेले, त्याचप्रमाणे वन्यजीवनाचे स्थलांतर गुजरातमध्ये सुरू झाले, तर राज्याच्या आणि जिल्ह्याच्या वनखात्याची गरजच काय? कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या वनखात्याची गरज आहे की नाही? अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली असल्याचे डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे. त्यांनी या पत्रकाद्वारे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि वन्यजीव संरक्षण धोरणांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
