अहिल्यानगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील कर्मचारी व शाखाधिकाऱ्यांच्या बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय होतो. या पार्श्वभूमीवर शिक्षक नेत्यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने प्रथमच समुपदेशनाने शाखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्याही ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या करताना रोष येऊ नये म्हणून संचालक मंडळाने शाखाधिकारी यांना समक्ष बोलावून ऑनलाईन पद्धतीने सेवा ज्येष्ठतेने पाहिजे ती शाखा देण्यात आली.

जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय पूर्वी नेहमीच वादग्रस्त होई. त्यामुळे तेथे ऑनलाइन समुपदेशाने बदली प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली. त्याचेच अनुकरण उशिरा का होईना, जिल्हा शिक्षक बँकेत करण्यात आले. यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, पदाधिकारी राजेंद्र सदगीर, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, बाबासाहेब खरात, नारायण पिसे, बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर, उपाध्यक्ष योगेश वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप आदी उपस्थित होते.

शिक्षक बँकेतील सर्वच कर्मचारी हे शिक्षकांचीच मुले. त्यातही अनेकजण शिक्षक नेत्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत शिक्षक नेत्यांचा दबाव, त्यातून बदली मागे घेणे किंवा न करणे असे प्रकार घडत. परंतु, गुरुमाउली – सदिच्छा मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी चर्चा करून समुपदेशनाने बदल्यांचा निर्णय घेतला. त्यास संचालक मंडळाने मान्यता दिली.

बँकेच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. गेली अनेक वर्षे शाखाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करत या बदल्या करण्यात आल्या. बँकेचे अनेक कर्मचारी एकाच शाखेत वर्षानुवर्षे आहेत. यातून सभासद व कर्मचाऱ्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले. याचा बँकेला तोटा होतो, हे लक्षात घेऊन लवकरच कर्मचाऱ्यांच्याही बदल्या केल्या जाणार आहेत.