मुस्लिम महिलांवर अन्याय होतं आहे. त्यांना न्याय द्यायचा असं दाखवत तिहेरी तलाक विरोधात सरकारने कायदा केला. मात्र त्यामध्ये महिला न्याय हा एक बहाणा असून ‘शरीयत’वर निशाणा साधला जात असल्याचा आरोप करत एकमेकांमधील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एका जाहीर सभेमध्ये केले. सोमवारी संध्याकाळी ते औरंगाबाद येथील आमखास मैदानावर ओवेसी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
बलात्कार, बाल विवाह, हुंडाबळी अशा विविध प्रश्नावर सरकारनं कायदे केले मात्र कायदा करून समाजातील वाईट गोष्टी संपल्या नाहीत. तिहेरी तलाक विरोधात कायदा करून अधिक गुंतागुंत वाढणार आहे. तलाक दिल्यास जेलमध्ये बसून मदत देण्याचं कायद्यात आहे. तशी मदत मिळणार नाही. साक्षीदार कोण होणार?, गुन्हा सिद्ध झाला नाहीतर समंधीत महिलेचं काय होणार?; असे प्रश्न उपस्थित करत मोदी सरकार टू जी स्कॅममधील एकाला शिक्षा देऊ शकले नाही. गावातील आमच्या मुस्लिम बहिणीला काय न्याय देणार? असा सवाल ओवेसी यांनी केला.
तिहेरी तलाक फक्त बहाणा असून ‘शरीयत’वर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे त्याविरोधात लढा उभारला जाणार असल्याचं सांगत एकाच वेळी तीनदा तलाक म्हणून तलाक देणाऱ्यांना समाजातून बहिष्कृत करा असं मत त्यांनी मांडलं. कायद्यानं प्रश्न सुटणार नाही. माणसातील राक्षसी वृत्तीचा नाश होऊन माणूस कसा होईल हे पहावं लागणार आहे. मुस्लिम लॉ बोर्ड माणसातील राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी काम करत असल्याचंही ओवेसी म्हणाले. मोदी सरकारला प्रत्येक गोष्ट आपण केली हे सांगण्याची सवय लागलीय. उद्या सौदी अरबमध्ये पाऊस पडला तरी मोदी म्हणतील माझ्यामुळे पडला, असा टोला लगावत तिहेरी तलाक मुस्लिम समाजातील मोहिमेमुळं बंद होत असल्याचा दावा त्यांनी केले. देशातील २४ लाख महिला आहेत ज्या आपल्या पतीसोबत रहात नाहीत. त्यातील २२ लाख हिंदू महिला आहेत. त्यांना न्याय मिळावा म्हणून कायदा करा अशी मागणी ओवेसी यांनी केली.
तिहेरी तलाकचा कायदा होत असताना लोकसभेत आम्हाला कोणी साथ दिली नाही. एक खासदार आणि दोन आमदार काय करणार असं म्हटलं जात आहे. मात्र आम्ही खंबीरपणे बाजू मांडली. भारताचा मोठा भाग हिंदूत्वाकडे गेला आहे. म्हणूनच आपला आवाज निर्माण करावा लागेल. त्यासाठी निवडणुकीच्या मैदानात आम्हाला साथ द्या. भाजपचे देशभरात एक हजार ४१८ आमदार आहेत. त्यामध्ये फक्त चार मुस्लिम आमदार आहेत. गुजरातमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने तिकीट दिलं नाही. त्यामुळे आपणही ‘सेक्युलरिझम’चे हमाल नाहीत. सेक्युलर भारत हवा असेल तर सर्वाना त्याचं ओझं उचलावे लागेल असेही मत ओवेसी यांनी मांडले.