भारताच्या चलनावर महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र, ज्याप्रकारे या चलनाचा वापर होतो ते गांधींच्या तत्वाविरोधात आहे. आज पैशाचा फायदा श्रीमंतांना होतो, गरिबांना नव्हे. त्यामुळे नोटेवर गांधी नसावेत, असं मत महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी व्यक्त केलं. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सर्वदूर पसरली आहे. पक्ष यात्रेचा फायदा कसा करुन घेणार हे पाहणे महत्वाचं असणार आहे, असेही तुषार गांधी यांनी म्हटलं.
डोंबिवलीत ‘हेल्पिंग हॅण्ड’ या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमानंतर तुषार गांधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा बोलताना ते म्हणाले की, “राहुल गांधींनी देशात राबवलेला ‘भारत जोडो’ यात्रा हा आवश्यक उपक्रम होता. त्यातून खूप चांगला संदेश समाजात पोहचला गेला. मात्र, पक्ष या संधीचा फायदा कसा करून घेतो, हे पाहणे गरजेचं आहे.”
हेही वाचा : “राज ठाकरेंनी स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे, भाजपाच्या नादी लागलेले…”, रोहित पवारांची ‘त्या’ पत्रावर खोचक टीका
अदाणी समूहाच्या प्रकरणाबद्दल विचारलं असता तुषार गांधींनी म्हटलं की, “देशात न्यायतंत्र असेल तर, न्यायाप्रमाणं वागलं पाहिजं. सरकारवर टीका करण्यात अर्थ नाही. आपल्याकडे स्वतंत्र न्यायप्रणाली आहे. त्यांनी आपली स्वंत्रतला दाखवण्यासाठी ह्या प्रकरणात काही चुकीचं दिसत असेल तर, कारवाई करणं गरजेचं आहे.”
देशात पुतळ्यावरून राजकारण सुरु आहे, याबद्दल विचारल्यावर तुषार गांधींनी सांगितलं, “पुतळ्याच्या राजकारणावर थोडं देखील स्वारस्थ नाही. कारण, पुतळे बनवणारा आणि लावणार दोघेही आपला अहंकार प्रदर्शित करण्यासाठी राजकारण करत असतात. ज्यांची प्रतिमा लावण्यात येते, त्यांना काहीच फरक पडत नाही.”
महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली जातात, यावर विचारल्यावर तुषार गांधी म्हटलं, “प्रत्येकांनी महापुरुष वाटून घेतले आहेत. स्वत:च्या महापुरुषाची स्तुती करताना दुसऱ्याच्या महापुरुषावर टीका करणे हे केवळ राजकारण आहे,” असं तुषार गांधी म्हणाले.