जालना : घरासमोरून जाण्या-येण्याच्या वादातून एका गटातील दोघांनी दुसऱ्या गटातील व्यक्तीच्या डोक्यात विट मारली. या मध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जाफराबाद पोलीस ठाण्यच्या हद्दीतील सावरखेडा येथे ९ जून रोजी घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. परमेश्वर सोनुने, असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात मृताचा भाऊ दीपक बाबुराव सोनुने यांनी फिर्याद दिली.
तर राजू सुखदेव सोनुने व विजय सुखदेव सोनुने, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जाफराबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दीपक सोनुने यांच्या घराच्या पाठीमागे सुखदेव सोनुने याची बांधकामाची वाळू पडलेली होती. त्यामुळे येण्या-जाण्यास होणाऱ्या त्रासाबाबत सांगण्यास गेले असताना वाद झाला. त्यातून पुढे मारहाण, तक्रार देणे झाले.