हिंगोली : गाणगापूर (कर्नाटक) येथे सीटीबस अन् ऑटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वसमतच्या दोन भाविक महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक भाविक महिला गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दरम्यान, दोन्ही मृत महिलांचे पार्थिव आणून त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रुक्मिणीबाई ढोरे व कुसुमताई जाधव अशी अपघातात मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत. एका जखमी महिलेस उपचारासाठी गुलबर्गा येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील चार ते पाच भाविक महिला गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी गाणगापूर येथे गेल्या होत्या. वसमत येथून निघालेल्या महिला बुधवारी सकाळी अक्कलकोट येथे पोहोचल्या. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्या गाणगापूर येथे दर्शनासाठी निघाल्या. गाणगापूर येथे बसने पोहोचल्यानंतर त्या ऑटोने दर्शनासाठी मंदिराकडे निघाल्या होत्या. यावेळी सीटीबस व ऑटोची समोरा समोर धडक झाली. या अपघातात ऑटोमधील भाविक महिला गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गाणगापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पी. राहुल यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी जखमींना उपचारासाठी गाणगापूर येथील शासकिय रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रुख्मीनीबाई विठ्ठल ढोरे (वय ४५, रा. बाभूळगाव) व कुसुमताई विठ्ठल जाधव (५५ वसमत) यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. गंभीर जखमी झालेया लक्ष्मीबाई ढोरे (रा. बाभुळगाव) यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारसाठी गुलबर्गा येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी गुरुवारी पहाटेच गाणगापूरकडे धाव घेतली आहे. मृत रुख्मीबाई यांच्या पश्चात पती, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. तर कुसुमबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या घटनेमुळे वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.