काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर ही धमकी देण्यात आली आहे. नरेंद्र जोशी यांच्या या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “…तर उदय सामंतांना जाळून टाकू” नाना पटोलेंसमोर भाषण करताना रिफायनरी विरोधकाचं खळबळजनक विधान

नाना पटोलेंसमोर अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आलं असेल तर त्यांनी तिथं थांबवायला पाहिजे होतं. माणूस रागाच्या भरात जे बोलत असतो ते योग्य की अयोग्य हे बाजूला बसलेल्या नेत्यांना कळायलं हवं. पोलिसांसमोर एखादी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती मंत्र्याला जाळून टाकण्याची धमकी देते. मंत्र्यांच्या तंगड्या तोडू असं वक्तव्य करते. मात्र, पोलीस यावर काहीही कारवाई करत नाहीत. ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.

मी दादागिरीला घाबरत नाही

रिफायनरी बाबत मी उद्योग मंत्री झाल्यापासून सांगत आलो आहे. दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करुन आपण निर्णय घेऊ. २९०० एकर जमीन शेकऱ्यांनी एमआयडीसीला संमतीपत्रकात दिली आहे. संवादाने प्रश्न सोडवले पाहिजेत. मी सुद्धा कोणातला आहे. त्यामुळे मी दादागिरीला घाबरत नाही. पण अशा प्रकारची प्रवृत्ती वाढू नये यासाठी पोलीस योग्य ती कारवाई करतील असे सामंत म्हणाले.

हेही वाचा- ‘…म्हणूनच त्यांनी लोकांना पैसे दिले,’ एकनाथ शिंदेंची पैठणमधील सभा आणि व्हायरल ऑडिओ क्लीपवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

काय म्हणाले होते नरेंद्र जोशी

“आम्ही मुंबईला असताना गावी आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. कोणत्या आधारावर गुन्हे दाखल करता? थोडंतरी लॉजिक लावा. कोणता तरी मंत्री सांगतोय म्हणून गुन्हे दाखल केले जातात. त्या उदय सामंतला तर आम्ही जाळून टाकू. आमचं गाव, आमची जागा, आमचं भविष्य आम्ही उद्धवस्त होऊ देणार नाही. आम्हाला आमची पवित्र पंचक्रोशी पाहिजे, आमच्या पंचक्रोशीत कुणी पाय ठेवला तर त्याचा पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या आंदोलनाची पहिली गोळी हा नरेंद्र जोशी स्वत:च्या अंगावर घेईल, पण हा प्रकल्प होऊ देणार नाही” असा आक्रमक पवित्रा नरेंद्र जोशी यांनी घेतला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant reaction on fire threat by refinery opponent dpj