शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचा बहुचर्चित जैतापूर दौरा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे.
जैतापूर येथील प्रस्तावित अणु ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध केला आहे. माडबन जनहित समितीतर्फे प्रकल्प परिसरात झालेल्या विविध आंदोलनांमध्ये सेनेचे नेते व कार्यकत्रे वेळोवेळी मोठय़ा संख्येने सहभागी झाले. पण मध्यंतरीच्या काळात समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर तडजोडीची भूमिका स्वीकारली. त्यामुळे आंदोलनातील हवा निघून गेल्यासारखी परिस्थिती होती. पण काही मोजके कार्यकर्ते बाजूला गेले म्हणून आंदोलन थांबू शकत नाही, असे ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत म्हटले होते. त्याचप्रमाणे आपण दिवाळीपूर्वी जैतापूरला येऊन प्रकल्पग्रस्तांच्या भेटीगाठी आणि मेळावा घेऊ, असेही जाहीर केले होते.
दरम्यान गवाणकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती बरखास्त करून माडबनचे सरपंच भिकाजी वाघधरे यांच्या अध्यक्षतेखाली जनहक्क समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीत प्रकल्पविरोधी आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. घोषणेनुसार ठाकरे दिवाळीपूर्वी येथे आले असते तर त्यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांचा मेळावा आयोजित करण्याची तयारीही नवीन समितीने चालवली होती. मध्यंतरी सेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू येथे आले असता प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीत पर्यावरण खात्याच्या मंत्री-वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच या संदर्भात ठाकरेंबरोबर जैतापूरला भेट देण्याचीही हमी प्रभू यांनी दिली होती. पण ठाकरेंचाच दौरा अजून झाला नसल्यामुळे  याबाबतही अनिश्चिततेचे वातावरण आहे.
आंदोलनाचे माजी नेते गवाणकर यांच्याबरोबर मोजकेच कार्यकर्ते गेल्याचा दावा सेनेचे नेते करत असले तरी भूसंपादन झालेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी मोबदला घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या संख्येत गेल्या महिनाभरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या दौऱ्याला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत आंदोलनाच्या स्थानिक नेत्यांमध्ये साशंकता आहे. म्हणूनच त्यांचा दौरा अजून होऊ शकला नसल्याचे सांगितले जाते. दिवाळीनंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे. अशा परिस्थितीत ठाकरेंना केवळ जैतापूरसाठी वेळ काढणे केव्हा जमू शकेल, याची खात्री स्थानिक नेते देऊ शकलेले नाहीत.