BBC Delhi Office IT Raid : बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयात आज प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बीबीसी कार्यालयात पाहणी केली जात आहे. मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याच कारणामुळे भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसी कार्यालयावर जाऊन धडकल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आपण लोकशाहीचे जे चार स्तंभ म्हणतो, त्यामध्ये न्यायव्यवस्था, प्रशासन, शासन यांच्यासह महत्त्वाचा स्तंभ म्हणजे माध्यम असतो. मी तुमच्याशी बोलत असताना या बातमीसोबतच बीबीसीच्या कार्यालायवर प्राप्तिकराची लोक गेली आहेत, ही सुद्धा बातमी सुरू असेल. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं? म्हणजेच काय, आम्ही वाटेल ते करू पण आवाज नाही उठायचा. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही जी पाशवीवृत्ती आपल्या देशात आज फोफावायला बघते आहे, ती आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या संपूर्ण देश खावून टाकेल.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

याशिवाय, “दोन-तीन दिवसांपूर्वी मी उत्तर भारतीयांच्या एका बैठकीत गेलो होते, तेव्हा पण त्यांना मी हेच सांगितलं की त्यावेळची लढाई होती ती स्वातंत्र्याची लढाई होती, आता हे स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे. गुलामगिरी ती गुलामगिरीच असते मग ती स्वकीयांची असेल परकीयांची असेल. आता वंदे भारत, वंदे एक्स्प्रेस हे सगळं ठीक आहे, घोषणाही दिल्या जात आहेत. पंतप्रधान उद्घटानं करत आहेत, झेंडे दाखवले जात आहेत. पण त्याचवेळी ते दाखवलं जाऊन माझी भारत माता पुन्हा माझी गुलाम कशी होईल, या दिशेने त्यांची जी पावलं चालली आहेत ती पावलं वेळेत ओळखून आपल्याला एकत्र यायला पाहिजे.” असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

काही महिन्यांपूर्वी मोहन भागवत मशीदीत गेले होते ते काय सोडून आले? –

याचबरोबर “शिवसेना म्हणजे काय, आमचं हिंदुत्व म्हणजे काय? हे काय आता वेगळं सांगण्याची गरज नाही. आता पुन्हा माझ्यावर टीका सुरू होईल की बघा यांनी हिंदुत्व सोडलं. पण त्या सगळ्या प्रश्नकर्त्यांना मी सांगू इच्छितो की केवळ रियाज शेख आणि त्यांच्यासोबत सगळे मुस्लीम बांधव-भगिनी शिवसेनेत आले म्हणून जर हिंदुत्व सुटत असेल, तर काही महिन्यांपूर्वी मोहन भागवत मशीदीत गेले होते ते काय सोडून आले? त्यानंतर आता आठ-दहा दिवसांपूर्वी त्यांचे दत्तात्रय होसबाळे ते म्हणाले होते गोमांस खाणाऱ्यांना दरवाजा बंद करता येणार नाही. मग त्यांनी काय सोडलं? या गोष्टी ज्या आहेत, त्या भानगडीत आपल्याला जायचं नाही. आपण जे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व सांगितलं आहे की राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व. जो देशद्रोही असेल मग तो कोणीही असो मग त्याची जात-पात, धर्म हा फक्त देशद्रोहीच त्याला आमचा विरोध आहे. या एका विचाराने तुम्ही सोबत आलेले आहात, ही तुमची ताकद खूप मोठं बळ देणारी असेल, हे बळ केवळ शिवसेनेलाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला ते बळ आणि एकजुट ही देशाला दिशा दाखवणारी असेल अशी आपण अपेक्षा आणि खात्री व्यक्त करतो.” असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेना भवन येथे रियाज शेख यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवेसनेत(ठाकरे गट) प्रवेश केला. त्यांचे उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून स्वागत केले. याप्रसंगी सुभाष देसाई यांचीही उपस्थिती होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackerays reaction on income tax raid at bbc office msr