महाराष्ट्रदिनानिमित्त आटपाडी येथील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर पोलिसांनी अघोषित बहिष्कार टाकला. या संदर्भात तहसीलदार जोगेंद्र कटय़ारे यांनी पोलीस विभागाला नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. दरम्यान, सांगलीच्या जिल्हा पोलिस मुख्यालयात पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
महाराष्ट्राच्या स्थापनेनिमित्त ५४वा महाराष्ट्रदिन मोठय़ा दिमाखात साजरा होत असताना आटपाडी तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण आटपाडी पोलीस ठाण्याला देण्यात आले होते. ध्वजारोहण सोहळा सुरू असताना मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस फिरकले नाहीत. याशिवाय शासकीय ध्वजाला मानवंदना देण्याचे पोलिसांचे कर्तव्य असताना त्यांनी ते बजावले नाही. यासंदर्भात काही संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान झाल्याची तक्रार केली आहे. या संदर्भात तहसीलदार जोगेंद्र कटय़ारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की ध्वजाला मानवंदना देण्याचे पोलिसांचे कर्तव्य असताना त्यामध्ये कुचराई झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, सांगली पोलीस मुख्यालयात पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विविध पथकांनी मानवंदना दिली. या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे गौरव पदक प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये निरीक्षक श्यामसुंदर कुरुंदकर, वसंतराव बाबर, सहायक निरीक्षक सुनील महाडिक, फौजदार बजरंग कापसे, हवालदार संभाजी कुंभार, मारुती शिष्ठे, आनंदराव कुंभार आदींचा समावेश आहे.
सांगली महापालिकेत मोठय़ा दिमाखात महाराष्ट्रदिनाचा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी महापौर कांचन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी या वेळी ध्वजाला मानवंदना दिली. या वेळी महापालिकेचे आयुक्त अजित कारचे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2014 रोजी प्रकाशित
आटपाडीत ध्वजारोहणावर पोलिसांचा अघोषित बहिष्कार
महाराष्ट्रदिनानिमित्त आटपाडी येथील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर पोलिसांनी अघोषित बहिष्कार टाकला. या संदर्भात तहसीलदार जोगेंद्र कटय़ारे यांनी पोलीस विभागाला नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

First published on: 03-05-2014 at 03:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Undeclared boycott of police on flag hoisting in atpadi