लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर येत्या रविवारी (दि. २ मार्च) नगरला दोन्ही काँग्रेसचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत होणा-या या मेळाव्यात माजी आमदार राजीव राजळे यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा होईल.
काँग्रेसचे जिल्ह्य़ातील दोन्ही मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे तसेच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्यासह ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख, आमदार बबनराव पाचपुते, चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख, अरुण जगताप, भाऊसाहेब कांबळे आदी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने याआधीच राजीव राजळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्य़ातील पक्षाच्या नेत्यांची बैठकीत ही गोष्ट स्पष्ट केली. त्याचीच औपचारिक घोषण अजित पवार या मेळाव्यात करतील. मेळाव्यास दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी केले आहे.