Vaishnavi Hagawane Death Case पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राज्यभरात होते आहे. या प्रकरणावर बुधवारी पुणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करीश्मा व सासू लता या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. यानंतर आता वैष्णवीला नाहक बदनाम केलं जात असल्याचं तिचे काका मोहन कस्पटे आणि मामा उत्तम बहिरट यांनी म्हटलं आहे.
हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी काय सांगितलं?
“वैष्णवीच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट्स व इतर आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या होत्या”, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. बुधवारी सुनावणी पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी वैष्णवीवर आरोप केले. तसेच पतीने रागाच्या भरात पत्नीला मारणे हा काही कौटुंबिक हिंसाचार ठरत नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
वैष्णवीच्या फोनमध्ये चॅटिंग असल्याचाही उल्लेख
वकील म्हणाले, “आम्ही (हगवणे कुटुंब) वेळोवेळी वैष्णवीच्या पालकांना जाणीव करून दिली होती की तिच्या मोबाइलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, तिच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडत आहे. एका व्यक्तीबरोबर तिचं चॅटिंग चालू होतं. त्यामुळे वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिचे फोन काढून घेतले. मात्र, त्यामधील चॅट आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही ते चॅट्स न्यायालयासमोर ठेवू. ती व्यक्ती कोण याची माहिती आम्ही तपास अधिकाऱ्यांना दिली आहे”.
वैष्णवीचे काका मोहन कस्पटेंनी काय सांगितलं?
मी इतकंच सांगेन की ज्या अनाठायी मागण्या हगवणे कुटुंबाने केल्या त्यामुळे आम्हाला जमीन बिल्डरच्या नावे लिहून द्यावी लागली आणि बिल्डरकडून आम्ही पैसे घेतले होते. हगवणे कुटुंबाने लग्नात ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी मागितली होती. आमची इतकं सगळं देण्याची ऐपत नव्हती. त्यावेळी आम्ही आगाऊ रक्कम घेतली. ऑन डॉक्युमेंट तसंच आहे असं वैष्णवीच्या काकांनी सांगितलं. वैष्णवीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मला एक सांगा त्यांचे जे वकील म्हणत आहेत की दोन चार कानाखाली बायकोला नवऱ्याने मारणं हा छळ नाही मग ३० खुणा अंगावर कशा? जे काही चॅटिंग सापडलं आहे ते म्हणत आहेत. सहा दिवस चॅट सापडले का? वैष्णवीला मारहाण झाल्यानंतर बैठकही झाली होती. आम्ही त्यांना बजावून आलो होतो की मारहाण करणं योग्य नाही. त्यावेळीही सर्वांनी मारहाण केली होती. त्यांना दुसरी कुठली बाजू दिसत नसल्याने आता वैष्णवीचं चारित्र्यहनन करत आहेत. लव्ह मॅरेज झालं आहे मग विश्वास का नाही? उगाच वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमचा मुलीवर पूर्ण विश्वास आहे असं वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी म्हटलं आहे. तसंच वैष्णवीच्या मामांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
वैष्णवीचे मामा काय म्हणाले?
“आरोपी हा आरोपीच असतो, ज्याने गुन्हा केला आहे तो कबूल करणार आहे का? मी गुन्हा केला म्हणून? आमची मुलगी गेली आहे. आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे. पोलीस त्यांचा तपास योग्य पद्धतीने करत आहेत. शिवाय जे काही आरोप वैष्णवीवर करत आहेत ते चुकीचे आहेत. तिच्या चारित्र्यावर विनानाकरण शिंतोडे उडवले जात आहेत. मी याबाबत हगवणे कुटुंबाचा निषेध करतो. स्वतःला वाचवण्यासाठी आता ते आमच्या मुलीवर आरोप करत आहेत. असा कुठलाही प्रकार झालेला नाही. आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ” असं वैष्णवीच्या मामाने म्हटलं आहे.