दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून विद्यार्थ्यांची माथी भडकवणारा युट्यूबर – व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकची आज जेलमधून सुटका झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज स्वीकारला असून ३० हजार रुपये जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केला. दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या या हिंदुस्थानी भाऊला अटक केली होती.

दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी ‘हिंदुस्थानी भाऊ’ धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी अंडी, दगड, चपला फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत युट्यूबर – व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकला अटक केली होती. त्यांतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे जामीनाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे हिंदुस्थानी भाऊने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असून अधिक चौकशी आणि तपास आवश्यक असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून न्यायालयात केला आणि त्यांनी भाऊच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikas pathak aka hindustani bhau got bail now out of jail vsk