सोलापूर : सोलापुरात १९३४ साली उभारण्यात आलेले आणि नंतर कालांतराने १६ वर्षांपूर्वी बंद पडलेले एन. एम. वाडिया धर्मादाय रुग्णालय पुन्हा नव्याने कात टाकत रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नूतनीकरण केलेल्या या रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला. रुग्णालयाचे संस्थापक डॉ. विष्णू गणेश वैशंपायन यांच्या अर्धपुतळ्यास त्यांचे नातू डॉ. राजीव वैशंपायन आणि कुटुंबीयांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बालाजी अमाईन्स कंपनीचे अध्यक्ष प्रताप रेड्डी यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या बाह्य उपचार विभागाचे उद्घाटन करण्यात आले. तर डॉ. उमा शिरीष वळसंगकर, उद्योजक रंगनाथ बंग, शिक्षण प्रसारक मंडळी, पुण्याचे व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पटवर्धन, डॉ. राजीव प्रधान आणि वाडिया रुग्णालयाचे माजी कर्मचाऱ्यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी होते.
डॉ. शिरीष कुमठेकर यांनी रुग्णालयाची पूर्वपीठिका सांगितली. तर डॉ. राजेंद्र घुली यांनी भविष्यकालीन रुग्णसेवेचा आढावा घेतला. रुग्णालयाचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रताप रेड्डी आणि राम रेड्डी यांनी बालाजी अमाईन्स कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) रुग्णालयास केलेल्या आर्थिक मदतीची माहिती दिली.
प्रवीणसिंह परदेशी यांनी पूर्वी जेव्हा वाडिया धर्मादाय रुग्णालय सुरू होते, तेव्हाची आठवण सांगितली. त्यांच्या आजी मीरा मोहन बायस यांचे निधन झाले, तेव्हा आजींचे बंधू असलेले ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते रमेश देव यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्यांना तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी जी वैद्यकीय सेवा दिली, त्यानंतर रमेश देव यांना नव्वदीपर्यंत आयुष्य लाभले, अशी आठवण परदेशी यांनी सांगितली. समाजातील तळागाळातील लोकांना उत्तम आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा अल्प दरात मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार
सन १९३४मध्ये सुरू झालेले आणि सोलापूरच्या वैद्यकीय सेवेचा पाया घातलेले एन. एम. वाडिया धर्मादाय रुग्णालय १६ वर्षांपूर्वी बंद पडले होते. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्यामुळे हे रुग्णालय नव्या रूपात गुरुपौर्णिमेदिवशी (१० जुलै) पुन्हा रुग्णसेवेत रुजू होत आहे. विश्वस्त बदलल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा विडा उचलत आज त्याचा श्रीगणेशा घडवून आणला.