अकोले : निळवंडेची उपसा यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली असतानाही उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी वाहू लागले. कडक उन्हाळ्यात अनेक गावांच्या शिवारात निळवंडेचे पाणी पोहोचले. उन्हाळ्यात पिके होरपळत असताना मिळालेल्या या पाण्यामुळे तेथील माणसांना दिलासा मिळाला आहे. केवळ अकोले तालुक्यासाठी असणाऱ्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय पाईप कालव्यांचा लाभ तालुक्यातील २ हजार ३२८ हेक्टर क्षेत्रास होतो. डाव्या उचस्तरीय कालव्याची लांबी २०.६८ किमी, त्याचे लाभक्षेत्र ८७१ हेक्टर तर उजव्या उच्चस्तरीय कालव्याची लांबी १९.३७ किमी व लाभक्षेत्र १ हजार ४५७ हेक्टर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निळवंडेचे मुख्य कालवे ६१० मिटर तलांकावरून सुरू होतात तर उचस्तरीय पाईप कालवे तलांक ६२७.४० मीटरवरून सुरू होतात. निळवंडे जलाशयाची पूर्ण संचय पातळी तलांक ६४८.१५ मी. आहे. उचस्तरीय पाईप कालवा हा तलांक ६३० मी ते ६४८ मी. या गुरुत्वीय दबावाने संकल्पित करण्यात आलेला आहे. म्हणजेच धरणातील पाणीपातळी जेव्हा तलांक ६३० मी. ते ६४८.१५ मी. दरम्यान असते तेव्हाच या उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी देता येते. पाणीपातळी तलांक ६३० मी. पेक्षा कमी झाली की धरणात पाणी असूनही या कालव्याद्वारे पाणी देता येत नाही.

धरणातील पाणीपातळी तलांक ६३० मी. पेक्षाही कमी झाली तरी उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी देता यावे यासाठी उच्चस्तरीय कालवे प्रणालीकरिता उपसा यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी निळवंडे जलाशयातून पाणी उपसा केला जातो. जलाशयात तलांक ६१४ मी. येथून १९५ अश्वशक्तीच्या दोन पंपांद्वारे हा पाणी उपसा होतो. ५५० मिमी आकाराच्या पाईपद्वारे हे पाणी वितरण कुंडात जमा होते. या ठिकाणी पाणीपातळी तलांक ६४२ मी. ठेवली जाते. त्या मुळे उचस्तरीय पाईप कालव्यातून पाणीपुरवठा करणे शक्य होते.

उच्चस्तरीय कालव्यांसाठीच्या या उपसा योजनेची चाचणी घेतल्यानंतर प्रथम डाव्या उचस्तरीय पाईप कालव्यातून पाणी सोडण्यात आले तर सध्या उजव्या उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. ही उपसा योजना कार्यन्वित झाल्यामुळे अंबड, धामणगाव आवारी, वाशेरे, तांभोळ यांसारख्या दुष्काळी गावांना यंदा होरपळून टाकणाऱ्या उन्हाळ्यात पाणी पाहायला मिळाले. हे पाणी ओढे, नाले, बंधारे यात सोडले जाते. पाणी जिरल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढते. त्याचा लाभ त्या परिसरातील शेतकऱ्यांना होतो. या उपसा योजनेमुळे धरणातील पाण्याची पातळी तलांक ६१४ मी. पर्यंत कमी झाली तरी उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी सोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे उच्चस्तरीय कालव्यातून बाराही महिने पाणी पुरवठा करता येणार आहे.

ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाले

निळवंडे धरणातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात कमी झालेली असतानाही एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यात निळवंडेचे पाणी वाशेरेसारख्या कायम दुष्काळी गावाच्या तलावात पडते आहे, हे दृश्य निश्चितच सुखावणारे आहे. अशा गोष्टीची या दुष्काळी भागाने कधी कल्पनाही केली नव्हती. यासाठीची योजना राबविणाऱ्या सर्वांबद्दल आम्ही कृतज्ञ आहेत. शांताराम गजे,ज्येष्ठ नागरिक, वाशेरे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water reaches drought hit villages through high level pipe canal nilwande dam pumping system operational sud 02