वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना वाळूतस्करांनी केलेल्या घातकी कटकारस्थानामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वाळू वाहतुकीच्या धावत्या मालमोटारीतून उडी मारावी लागली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे त्यांच्यावर हा बाका प्रसंग ओढवला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता त्यांचा जीव बचावला.
तहसीलदार शिल्पा ठोकडे या वाळूतस्करांसाठी ‘कर्दनकाळ’ समजल्या जातात. महसूल सेवेत रुजू होण्यापूर्वी त्या पोलीस खात्यात फौजदार म्हणून कार्यरत होत्या. नंतर त्या महसूल खात्यात आल्या. दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी वाळूतस्करी रोखण्यासाठी अव्याहत मोहीम आखली आहे. रात्री-अपरात्री त्या स्वत: मोहिमेवर जातात. माळकवठे येथे रात्री वाळूतस्करी रोखण्यासाठी तलाठी भाईजान यांच्याबरोबर गेल्या असता तेथे चोरटी वाळू वाहतूक करणारी मालमोटार (एमएच १३-६७५९) आढळून आली. त्या वेळी कारवाईच्या भीतीने मालमोटार चालकांनी धूम ठोकली असता तहसीलदार ठोकडे यांनी मालमोटार ताब्यात घेऊन तलाठी भाईजान यांना चालविण्यास दिली व त्या मालमोटारीतच बसून येत होत्या.
तथापि, मालमोटार ताब्यात घेत असतानाच मालमोटार मालक व त्याच्या साथीदारांनी मालमोटारीचा एअर पाइप हळूच कापला होता. त्याची कल्पना तहसीलदार ठोकडे यांना नव्हती. मालमोटार ताब्यात घेऊन मंद्रुप पोलीस ठाण्याकडे आणत असताना मालमोटारीचा ब्रेक लागेनासा झाला आणि वेग वाढून मालमोटारीवरील नियंत्रण सुटले. त्या वेळी धोक्याची जाणीव होताच तहसीलदार ठोकडे व तलाठी भाईजान या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता धावत्या मालमोटारीतून उडय़ा ठोकल्या. पुढे चढावर जाऊन मालमोटार थांबली. याप्रकरणी संबंधित मालमोटार चालक व मालकांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2013 रोजी प्रकाशित
महिला तहसीलदारांनी घेतली धावत्या मालमोटारीतून उडी
वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना वाळूतस्करांनी केलेल्या घातकी कटकारस्थानामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वाळू वाहतुकीच्या धावत्या मालमोटारीतून उडी मारावी लागली.
First published on: 15-11-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women tahsildar jumped from running motor