वेगाने जाणा-या मालवाहू लहान टेम्पोने एका दीड वर्षीय चिमुरडीला धडक दिली. तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येवल्यातील लक्ष्मीनारायण रस्ता परिसरात ही घटना घडली. अवजड वाहतुकीमुळे होणा-या अपघातांचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासनाने याबाबत ठोस कृती करण्याचे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.

रणवी संतोष सिंधी (दीड वर्ष) हे या चिमुकलीचे नाव असून. लक्ष्मीनारायण रस्त्याच्या कडेला ती आपल्या भावासोबत घराच्या अंगनात खेळत होती. या रस्त्यावरून वेगाने जाणारा रेतीचा मालवाहु छोटा हत्ती ट्रक तिच्यावर येवून धडकला. तिच्या डोक्याला यामुळे गंभीर मार बसला आहे. तिला तात्काळ नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

शहरात दुचाकी, विटा- वाळू वाहून नेणारी लहान मोठी वाहने भरधाव वेगाने जातात. मालवाहतुक करणा-या वाहनचालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा संताप येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.