आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या रविवारी (२१ जून) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आठ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर होणाऱ्या या अभिनव उपक्रमाबद्दल पत्रकार परिषदेत माहिती देताना सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट विलास पाटणे यांनी सांगितले की, येत्या रविवारी सकाळी साडेसात ते सव्वाआठ या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमाला चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोसायटीच्या विविध शाळा-महाविद्यालयांचे मिळून आठ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी ध्यान, योगासने आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या कार्यक्रमानंतर धर्माधिकारी यांचे याच विषयावरील विशेष व्याख्यान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी योगाभ्यास व योगप्रसारामध्ये पुढाकार घेण्याची गरज प्रतिपादन करून अॅडव्होकेट पाटणे म्हणाले की, सोसायटीतर्फे मागील शैक्षणिक वर्षांमध्ये राज्यस्तरीय योग महोत्सव रत्नागिरीत भरवण्यात आला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांच्या योगपटू व प्रशिक्षकांनी त्यामध्ये भाग घेतला. सोसायटीच्या शिर्के हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या पूर्वा किनरे या विद्यार्थिनीने पॅरिसमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग संमेलनात उज्ज्वल यश संपादन केले. येत्या रविवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पूर्वतयारीसाठी सोसायटीच्या विविध शैक्षणिक संकुलांमधील निवडक विद्यार्थी आणि शिक्षकांनी गेले आठ दिवस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सरावसत्र सुरू केले आहे. रत्नागिरीतील कारागृहाच्या कैद्यांसाठीही सोसायटीचे योगशिक्षक अशाच स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहेत.
या कार्यक्रमाव्यतिरिक्त रविवारी शहरात एनसीसीचे छात्र, तसेच रत्नागिरी जिल्हा पतंजली योग समितीतर्फेही योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2015 रोजी प्रकाशित
योगदिनानिमित्त आठ हजार विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या रविवारी (२१ जून) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आठ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत.

First published on: 20-06-2015 at 07:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga day at ratnagiri