हिंगोली : शाळेच्या पहिल्या दिवसापासून गणवेश वाटप न करणाऱ्या पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी मंगळवारी दिले.शाळेच्या पहिल्या दिवशी किती विद्यार्थी हजर होते, कोणत्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी होती याची माहिती घ्यावी आणि कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना भेटी द्याव्यात, असेही अंजली रमेश यांनी सांगितले आहे. गणवेश वितरण न केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हे काम का पूर्ण केले नाही, अशी विचारणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यंत्रणेकडे केली. त्यास अधिकारी उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
गणवेश खरेदीचा निधी शाळेच्या बँक खात्यावर जमा होत नाही. त्यासाठी शिक्षण व्यवस्थापन समितीला स्वतंत्र बँक खाते सुरू करणे क्रमप्राप्त होते. पूर्वीचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असताना ते दीड वर्षांपूर्वी बंद करून नव्याने ‘एचडीएफसी’ खाते सुरू करावेत, अशा सूचना होत्या. ती कारवाई पूर्ण होऊ शकली नाही. तसेच जिल्ह्यातील पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांपैकी हिंगोलीची जागा रिक्त आहे. औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, वसमत या चारही तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी काम करत आहेत. परिणामी अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. गणवेश वितरण न होण्यामागेही हेच कारण असल्याचे सांगण्यात येते.