रेश्मा राईकवार
मराठीत ऐतिहासिकपटांची एकच लाट आली आहे. त्यातही शिवकालीन इतिहासावरील चित्रपट प्रेक्षकांकडूनही आवडीने पाहिले जात असल्याने शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या मोहिमा, स्वराज्यासाठी लढलेले शूरवीर यांच्या गोष्टी पडद्यावर भव्यदिव्यपणे जिवंत करण्याची एक अहमहमिकाच जणू मराठी चित्रपटकर्मीमध्ये लागली आहे. त्याच लाटेतला नवा अध्याय म्हणजे ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट. डॉ. अमोल कोल्हे यांना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपण याआधी पाहिलेले आहे आणि त्यांच्या शैलीत शिवकालीन इतिहास प्रेक्षकांनी याआधी मालिकांमधून अनुभवला आहे. रुपेरी पडद्यावर मात्र ते पहिल्यांदाच शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहेत.
‘शिवप्रताप गरुडझेप’ हा शिवाजी महाराजांच्या आग्र्याहुन सुटका मोहिमेवर बेतलेला चित्रपट आहे. शाहिस्तेखानाची बोटं कापून त्याला पळवून लावल्यानंतर महाराजांनी सुरतेवर हल्ला केला आणि सुरत लुटली. या दोन घटनांचा परिणाम म्हणून चवताळलेल्या औरंगजेबाने एका हिंदू राजाकडूनच दुसऱ्या हिंदू राजाला अडकवण्याचा घाट घातला. आणि महाराजांना आग्र्यापर्यंत आणण्यासाठी जयसिंग राजे मिर्झा यांचा औरंगजेबाने मोहरा म्हणून वापर केला. हा सगळा कथाभाग चित्रपटाच्या पूर्वार्धात पाहायला मिळतो. तर उत्तरार्धात प्रत्यक्ष आग्र्याहुन सुटकेची मोहीम महाराजांनी कशी आखली आणि ती तडीस कशी नेली, याचं कथाचित्रण पाहायला मिळतं. मुळात, हा कथाभाग अजूनपर्यंत सविस्तरपणे रुपेरी पडद्यावर आलेला नाही त्यामुळे पहिलेपणाचा म्हणून जो काही आनंद आहे तो या चित्रपटाच्या वाटय़ाला आलेला आहे. सध्या एकाच कथानकावर दोन-दोन ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनिखड’नंतर आता नरवीर बाजीप्रभूंची शौर्यगाथा ‘हर हर महादेव’ या अभिजीत देशपांडे दिग्दर्शित चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसंच आग्र्याहुन सुटकेची मोहीमही ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात आता प्रेक्षक पहिल्यांदा पाहू शकतात. याच विषयावर दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. एकाच कथानकाकडे पाहण्याचे दोन वेगवेगळे दिग्दर्शकीय दृष्टिकोन, भिन्न लेखनशैली आणि नवनव्या कलाकारांच्या अभिनयातून उलगडणारा शिवकालीन इतिहास ही पर्वणी एकाअर्थी यामुळे साध्य होत आहे. त्यामुळे मनाची पाटी कोरी ठेवून ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट पाहायला हवा.
वर म्हटल्याप्रमाणे डॉ. अमोल कोल्हे यांना आपण अनेक वेळा नाटक आणि मालिकेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिलेले आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचे परिचित रूप आणि त्यांची सहज अभिनयशैली या चित्रपटातही अनुभवायला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शनही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे दिग्दर्शन करणाऱ्या कार्तिक केंढे यांनी केले असल्याने चित्रपटाची मांडणी, त्यातील काही ठरावीक कलाकारांचे चेहरे अशा बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांच्या परिचयाच्या आहेत. प्रेक्षकांच्या मनातील परिचित प्रतिमेला कुठल्याही प्रकारे छेद न देता आपल्या नेहमीच्या शैलीत चित्रपटाची मांडणी करताना दिग्दर्शकाने याला धारदार संवादांची जोड दिली आहे. मराठी माणसाला दिल्लीचे तख्त आणि दिल्लीच्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख व्हायलाच हवी.., मराठे आणि वाघ कोणाच्या वाटय़ाला जात नाहीत, त्यांना कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाही.. अशा खटकेबाज संवादांची पेरणी या चित्रपटात आहे. उत्तरार्धात पेटीतून पळून जाण्याचा भागही त्यातली उत्कंठा कायम ठेवत तर्कशुद्ध मांडणीतून दिग्दर्शकाने रंगवला आहे. काहीसा मालिकेतील मांडणीचा प्रभाव चित्रपटावर जाणवतो, मात्र त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर पकड घेण्यात कुठेही कमी पडत नाही. सोयराबाई आणि पुतळाबाईंच्या वाटय़ाला काही प्रसंग यात आले आहेत, मात्र याहून ठोस भूमिका त्यांना देता आली असती. चित्रपटात खुद्द अमोल कोल्हे यांच्यासह यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, शैलेश दातार, पल्लवी वैद्य, मनवा नाईक, हरीश दुधाडे असे सगळेच कसलेले कलाकार असल्याने अभिनयाच्या बाबतीतही चित्रपट सरस ठरतो. किंबहुना, वर म्हटल्याप्रमाणे बहिर्जी आणि त्यांचे सहकारी अशा भूमिकांमधून वेगळेच कलाकार पाहायला मिळाल्याने ऐतिहासिक पटांमधील तोचतोचपणाही काहीसा टाळला गेला आहे. मूळ कथाविषयाशी प्रामाणिक राहत केलेल्या मांडणीमुळे आग्र्याहुन सुटकेच्या मोहिमेची आगळी कथा पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. अर्थात, हा चित्रपट याहून अधिक सरस करता आला असता हेही तितकेच खरे.
शिवप्रताप गरुडझेप
दिग्दर्शक – कार्तिक केंढे, कलाकार – डॉ. अमोल कोल्हे, यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, शैलेश दातार, पल्लवी वैद्य, मनवा नाईक, हरीश दुधाडे.
