बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा संताप; म्हणतो “असे १०० सलमान गल्ली झाडायला…”

सलमान खानला कोणी मोठं झालेलं पहावत नाही; अभिजीत बिचकुलेचा संताप

Abhijit Bichukle, Salman Khan, Big Boss,
सलमान खानला कोणी मोठं झालेलं पहावत नाही; अभिजीत बिचकुलेचा संताप

बिग बॉसच्या १५ मध्ये सहभागी झालेले अभिजित बिचुकले आपल्या वादग्रस्त वक्तव्यं आणि इतर सदस्यांमुळे नेहमी चर्चेत राहिले. त्यांना अनेकदा यावरुन सलमान खानकडून ओरडाही खावा लागला. पण आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी सलमान खानविरोधात संताप व्यक्त केला असून गल्ली झाडायला १०० सलमान उभे करेन असं म्हटलं आहे. सलमान खानला कोणी मोठं झालेलं पहावत नाही असा आरोपही त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. इतकंच नाही तर वाघ पिंजऱ्यात होता असं सांगत सलमानला इशाराही दिला आहे.

अभिजीत बिचुकले वाईल्ड कार्ड एंट्री करत बिग बॉसच्या घरात गेले होते. दरम्यान तिथून बाहेर पडल्यानंतर बोलताना ते म्हणाले की, “मला बाहेर येऊन २४ तास झाले असून कुटुंबाला भेटण्यासाठी साताऱ्यात आलो आहे. बिग बॉसचा अनुभव पाठीशी आहे. धमाल, राग, लोभ अशा सर्व गोष्टींचा आनंद घेत मी खेळलो आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा खुलासा मी पत्रकार परिषद घेऊन करणार आहे”.

“मी स्वत:हून बाहेर पडायला लागलो होतो. मी जेव्हा बाहेर पडणार होतो तेव्हा बिग बॉसने विनंती करुन थांबवलं होतं. आता त्यांच्या नियमानुसार काढलं आहे. याबद्दल मला काही शंका आणि मनात गोष्टी आहेत. त्या मी पत्रकार परिषदेत मांडणार आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“संपूर्ण जगानं पाहिलं तसं तेथील काही लोक जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप करत होते. आमची मोठी भांडणं झाली होती, त्यात मी शिवी दिली हे तर जगजाहीर आहे. त्याच्यानंतर मग सलमान खानने माझ्यावर जो काही राग प्रकट केला ते न शोभणारं आहे. त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

पुढे ते म्हणाले की, “सलमान खानला माझा मत्सर निर्माण झाला. त्याला कोणी मोठं झालेलं पहावत नाही. त्याचा इतिहास पहा. माझं झालेलं कौतुक त्याला पहावलं नाही. त्याला वाटतं की तोच शो चालवतो. त्याने १४ सीझन चालवले असतील, पण माझं आव्हान आहे की हा सीझन मी चालवणार. सलमान खान कमी पडला म्हणून त्याचा मत्सर जागा झाला आणि माझ्यावर चिडला. त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. कारण आत असताना त्याने जी भाषा वापरली ना ती भाषा माझ्यासोबत महाराष्ट्रात कोणीही वापरली नाही. वाघ पिंजऱ्यात होता म्हणून तो चाबूक फिरवत होता. पण आता वाघ बाहेर येतोय”.

“मी शिवी दिल्यानंतर त्याचा बाऊ करण्यात आला. नंतर सलमान खान नावाची जी कोणी व्यक्ती आहे तो स्वत:ला काय समजतो माहिती नाही. पण त्याला अजून अभिजीत बिचुकले काय हे कळलं नाहीये. महाराष्ट्रातील नेत्यांना अभिजीत बिचुकले कोण हे माहिती आहे. सलमान खान अजून अंड्यात आहे, अजून अंड्याबाहेर यायचं आहे. त्याला कळेल अभिजीत बिचुकले कोण आहे ते आणि कोणाशी पंगा घेतोय. त्याला काय ते दिल्लीतून आलेले गायक वैगेरे वाटले का ? मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्यातील गादीचा वैचारिक वारस आहे. शाहू, फुले, आंबेडकांना मानणारा मी आहे. असे १०० सलमान मी गल्ली झाडायला दारात उभं करेन,” असं अभिजीत बिचुकले म्हणाले.

अभिजीत बिचुकले यांनी यावेळी अनेक महत्वाचे सीन कट करण्यात आल्याचा तसंच विजयी उमेदवार आधीच ठरवल्याचा आरोपही केली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhijit bichukle on salman khan after exit from big boss house sgy

Next Story
IND vs SA : वनडे मालिका गमावल्यानंतर केएल राहुलची भावनिक पोस्ट; गर्लफ्रेंड अथिया शेट्टीनं केली ‘अशी’ कमेंट!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी