छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘शौर्य और अनोखी’मध्ये काम करणारा अभिनेता सूरज थापरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूरजची बहिण वनीताने या संदर्भात माहिती दिली आहे. सूरज गोव्याला मालिकेचे शूट करत होता. गेल्या तीन दिवसांपासून सूरजला ताप आला होता. त्यामुळे चित्रीकरण संपवून तो मुंबईला परत येताच त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सूरजची बहिण वनीताने ‘नवभारत टाइम्स’शी संवाद साधला. तेव्ही तिने, गोव्याहून मुंबईला आल्यावर एअरपोर्टवर सूरजच्या दोन चाचण्या करण्यात आल्या. त्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी आणि पल्स रेट चेक करण्यात आले. तसेच सूरजने करोना चाचणी देखील करुन घेतली. पण करोना चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. मुंबईत आल्यावर ताप आला आणि ऑक्सिजन लेव्हल कमी झाली. त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती दिली.

आणखी वाचा : IPL स्थगित झाल्यानंतर करोना रुग्णांसाठी ‘विरुष्का’चा पुढाकार; निधी गोळा करण्यासाठी पोस्ट केला व्हिडिओ

पुढे तिने सांगितले की गोव्यात मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना सूरज हा हॉटेलमध्येच थांबत असते. सेटवर शूटिंगदरम्यान गप्पा मारण्यासही परवानगी नव्हती. माझा भाऊ लवकर बरा होण्यासाठी कृपया सर्वांनी प्रार्थना करा.

सूरजने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या ‘ससुराल गेंदा फूल’, ‘एक नई पहचान’ आणि ‘छल-शह और मात’ या मालिका लोकप्रिय ठरल्या होत्या. आता तो ‘शौर्य और अनोखी’ या मालिकेत काम करताना दिसत आहे.