ग्लॅमरची ही दुनिया बाहेरून जेवढी झगमगीत दिसते. आतून ती तेवढीच पोकळ असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. नुकताच टीव्ही अभिनेत्री सुलगना चॅटर्जीने सोशल मीडियावर तिचा एक अनुभव शेअर केला. सुलगनाने एका एजंटसोबत झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचा स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सुलगनाने म्हटले की, तिला आतापर्यंत कोणत्याही बड्या निर्माता किंवा दिग्दर्शकांनी प्रत्यक्षपणे तडजोड करावी लागेल असे स्पष्ट सांगितलेले नाही. पण हे मधले एजंट असतात त्यांच्याकडून अनेकदा अशा गोष्टींची विचारणा करण्यात आली. इन युथशी बोलताना सुलगना म्हणाली की, मी कोणत्याही प्रसिद्धीसाठी ही पोस्ट शेअर केलेली नाही. त्या एजंटला माझा नंबर कसा मिळाला आणि त्याने मला नवीन बॉलिवूड प्रोजेक्टसाठी कशी विचारणा केली हे मला आठवलं. बॉलिवूडमधील एका प्रोजेक्टमध्ये मी काम करणार असल्याचे जेव्हा मला कळले, तेव्हा सुरूवातीला फार आनंद झाला. पण त्यानंतर एजंटने मला तडजोड करण्यास सांगितले. पण त्याच्या या उत्तराला मी सपशेल नकार दिला. पण तरीही तो मला सतत मेसेज करायचा.

कास्टिंग काऊचची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही विद्या बालन, राधिका आपटे या अभिनेत्रींनी त्यांना आलेले अनुभव शेअर केले होते.