मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीचा उल्लेख आला की लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या अभिनेत्यांचे नाव आपसुकच आपल्या तोंडावर येते. या चारही कलाकारांची मैत्री चित्रपटांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धडाकेबाज’ यांसारख्या कितीतरी चित्रपटांमध्ये हे चारही कलाकार एकत्र नसले तरी जोडीने का होईना आपल्याला पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत यांनी अशोक, सचिन आणि महेश या तिनही अभिनेत्यांसोबत अनेक चित्रपट केले आहेत. अगदी अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनीही एकत्र काम केलेय. पण महेश कोठारे, सचिन आणि लक्ष्मीकांत या तिघांना रसिकांना एकत्र एकाही चित्रपटात पाहता आले नाही. महेश कोठारे आणि सचिन हेसुद्धा एकत्र चित्रपटात झळकले नव्हते. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आयडियाची कल्पना’ चित्रपटात सचिन आणि महेश एकत्र झळकले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनामुळे या चारही कलाकारांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : माधुरी दीक्षित करणार मराठीत पदार्पण

बेर्डे, सराफ, कोठारे, पिळगावकर या चारही कुटुंबाच्या ‘नेक्स्ट जनरेशन’मध्येही त्यांच्या वडिलांप्रमाणे मैत्री पाहायला मिळते. नुकताच सचिन पिळगावकर यांचा ६०वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी अगदी जवळच्या मित्रमंडळींना पार्टीसाठी आमंत्रित केलेले. पाहुण्यांमध्ये साहजिकच बेर्डे, सराफ आणि कोठारे कुटुंबांचाही समावेश असणार. महेश कोठारे त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाला काही कारणास्तव जाऊ शकले नाहीत. मात्र, त्यांचा मुलगा आदिनाथ आणि सून उर्मिला यांनी पार्टीला उपस्थिती लावली होती. तसेच, अभिनय आणि स्वानंदी बेर्डे हे भाऊ-बहिण, अनिकेत बेर्डे हेसुद्धा तेथे उपस्थित होते. या पार्टीतील श्रिया, स्वानंदी, अभिनय आणि अनिकेत यांच्यासोबतचा सेल्फी आदिनाथने शेअर केलाय. हा सेल्फी पाहता बेर्डे, सराफ, कोठारे, पिळगावकर या मित्रांची चौकट त्यांच्या मुलांनी तशीच कायम ठेवल्याचे दिसून येते.

वाचा : ‘जॅकलिन तिच्या मुलांची नावं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर असं ठेवेल’

अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत वगळता बाकी तिनही अभिनेत्यांची मुलं चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. अनिकेतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली असता तो शेफ असल्याचे कळते. महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो आता निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्राकडेही वळला आहे. सचिन यांची मुलगी श्रिया हिने ‘एकुलती एक’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इतकेच नव्हे तर ‘फॅन’ या बॉलिवूड चित्रपटात ती चक्क शाहरुख खानसोबत झळकली. तर काही महिन्यांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय ‘ती सध्या काय करते’ म्हणत रुपेरी पडद्यावर झळकला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adinath kothare shriya pilgaonkar abhinay swanandi berde and aniket saraf star kids in one selfie