नुकताच मुंबईला ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसला. गेल्या आठवडाभरापासून ओखी चक्रीवादळाने केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप भागात थैमान घातले होते. यानंतर हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने सरकत होते. सोमवारी संध्याकाळपासूनच राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी देखील मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. ओखी चक्रीवादळामुळे शाळा, महाविद्यालय, कार्यालये बंद ठेवण्यात आले होते. मात्र, अशा वातावरणातही ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांनी आपल्या शुटिंगचे शेड्यूल रद्द होऊन दिले नाही.

वाचा : बहुचर्चित प्रोजेक्टमधून आमिरचा काढता पाय?

ऐश्वर्या, अनिल आणि राजकुमार सध्या आगामी ‘फन्ने खान’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. महाराष्ट्रात ओखी वादळाची चाहूल लागली होती तेव्हा हे कलाकार भांडूप येथील एका स्टुडिओत काम करत होते. चक्रीवादळाचे वृत्त कळूनही घरी न जाता तब्बल १२ तास ही कलाकार मंडळी स्टुडिओत काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत सर्व कलाकार काम करत होते. यादरम्यान, कलाकार आणि क्रूच्या सुरक्षेचा विचार करता दिग्दर्शकाने स्टुडिओतच चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला.

वाचा : सॅनिटरी नॅपकिनविषयी दियाने दिला महत्त्वाचा संदेश

ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेल्या ‘एवरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा ‘फन्ने खान’ हा रिमेक आहे. अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून राकेश ओमप्रकाश मेहरा आणि प्रेरणा अरोरा चित्रपटाचे निर्माते आहेत.