‘रुस्तम’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अभिनेता अक्षय कुमार लवकरच विनोदवीर कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहे. टेलिव्हिजन विश्वात ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ व ‘द कपिल शर्मा शो’ हे दोन्ही कार्यक्रम आणि ते सादर करणारे अनुक्रमे विनोदवीर कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. पण या दोघांचीही काम करण्याची, विनोदाची शैली फारच वेगळी आहे. कपिल शर्माची लोकप्रियता पाहता त्याच्या कार्यक्रमात आजवर अनेक कलाकारांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. पण, कृष्णा अभिषेक व भारती सिंग यांच्या विनोदी शैलीवर सध्या काही कलाकारांनी नाराजीचा सूर लगावला आहे.
अभिनेत्री जॅकलीन आणि ‘ढिशूम’ चित्रपटाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असतानाच आता अभिनेता अक्षय कुमारनेही ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्ये न जाता कपिलच्या मोहल्ल्यातील हास्यमैफलीला हजेरी लावण्याचे ठरवले आहे. यापूर्वी ‘हाऊसफुल्ल ३’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चित्रपटाची टीम कृष्णा अभिषेकच्या कार्यक्रमात गेली असता विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधवने अभिनेत्री लिसा हेडन हिच्यावर केलेल्या विनोदांवर अक्षय कुमारने नाराजी व्यक्त केली होती. लिसाला हिंदी भाषा जास्त येत नसतानाही ‘ब्लॅक आफ्रिकन’ म्हणत तिच्यावर केलेल्या विनोदांवर अक्षयने नाराजी दर्शवली होती. अक्षय कुमारचा आगामी सिनेमाचे कथानक आणि त्याच्या पात्राची गंभीरता पाहता ‘रुस्तम’च्या कथानकाचा अपमान होऊ नये म्हणूनच ‘रुस्तम’च्या प्रसिद्धीसाठी अक्षयने ‘द कपिल शर्मा शो’ला जाण्याचे ठरवले आहे, असे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2016 रोजी प्रकाशित
‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार ‘रुस्तम’चा थरार
कपिलच्या मोहल्ल्यातील हास्यमैफलीला हजेरी लावणार खिलाडी कुमार
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-07-2016 at 11:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar chooses the kapil sharma show to promote rustom