प्रेम… ही भावना तुम्हाला सर्वोच्च आनंद देते किंवा दुःखही देते. नातेसंबंधात एकमेकांना समजणं, विश्वास ठेवणं आणि पार्टनरने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावणं महत्त्वाचं असतं. पण अनेकांना हेच जमत नाही. अक्षय कुमार आणि रवीना टंडनचं नातं विश्वासावर टिकून होतं आणि विश्वासघातामुळेच तुटलं. दोघांचं एकमेकांवर फार प्रेम होतं. दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी तेव्हाच्या वृत्तपत्रांचे रकाने भरायचे. दोघं लग्नही करणार होते. पण त्या एका रात्रीने दोघांचं आयुष्यच बदलवून टाकलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९० च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन हे उभरते कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवत होते. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होत गेले. १९९४ मध्ये दोघांचा मोहरा सिनेमा प्रदर्शित झाला. याच दरम्यान दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागली. या सिनेमातील टिप- टिप बरसा पानी गाण्याची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. १९९६ मध्ये आलेल्या खिलाडियों का खिलाडी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघं लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. असंही म्हटले गेले होते की, दोघांनी एका मंदिरात जाऊन साखरपुडाही केला होता. अक्षयला रवीनाने लग्नानंतर काम करु नये असे वाटत होते. त्याच्या एका सांगण्यावरून रवीना सिनेसृष्टी सोडायलाही तयार झाली होती.

असे म्हटले जाते की, खिलाडियों का खिलाडी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि रेखा यांच्यात जवळीक वाढत गेली. एकीकडे रवीना अक्षयसाठी करिअर सोडत होती तर दुसरीकडे अक्षय मात्र रेखा यांच्याशी जवळीक साधत होता. अक्षय आणि रेखाच्या जवळीकीमुळे रवीना तुटलीच. खिलाडियों का खिलाडी सिनेमाच्या एका पार्टीमध्ये अक्षय आणि रेखा यांना मध्यरात्रीपर्यंत एकत्र पाहण्यात आले. अक्षयच्या या वागणुकीमुळे रवीनाने त्याच्याशी असलेले संबंध तोडले. ही रात्र रवीना आणि अक्षयच्या प्रेमासाठी काळ रात्र ठरली.

रवीनाने एका मुलाखतीत सांगितले की, कोणतंही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात विश्वास असणं फार आवश्यक असतं. ती म्हणाली की, अक्षयसाठी ती करिअर सोडायला तयार होती, पण त्या बदल्यात अक्षयकडून तिला विश्वासघात मिळाला. ती पुढे म्हणाली होती की, तिच्याआधीही अक्षयने अनेक मुलींसोबत साखरपुडा केला होता. पण सिनेसृष्टीतील त्याच्या कामावर या सगळ्यांचा परिणाम होऊ नये म्हणून तो प्रेयसींना साखरपुडा झाल्याची बातमी लपवायला सांगायचा. ब्रेकअपनंतर अक्षयने अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले तर रवीनाने व्यावसायिक अनिल थडानींशी लग्न केले. आज दोघंही आपआपल्या संसारात सुखी आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar close to rekha break the relation with raveena tandon