बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या हातात पॅड घेऊनच फिरताना दिसत आहे. त्याचा ‘पॅडमॅन’ सिनेमा ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अगदी जमेल त्या मार्गाने अक्षय सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच अक्षय दिल्लीतील ‘इंदिरा गांधी इंडोर स्टेडिअम’मध्ये खेळाडूंना भेटायला गेला होता. यावेळी बॅडमिंटन खेळाडूंसोबत त्याने काही वेळ घालवला. अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो बॅडमिंटन खेळताना दिसतो. यावेळी त्याने काळ्या रंगाचा ट्रॅक सूट घातला होता. दिल्ली सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या अभियानाला त्याने भेट दिली. खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला.

सध्या ‘पॅडमॅन चॅलेंज’ असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. या चॅलेंज अंतर्गत अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने एक कॅम्पेन सुरू केले आहे. या कॅम्पेनमध्ये प्रत्येकाने हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन फोटो काढायचा आणि तो सोशल मीडियावर शेअर करायचा. या कॅम्पेनला बॉलिवूडपासून क्रिकेट जगतापर्यंत साऱ्यांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘खेलो इंडिया’ या अभियानाबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की, ‘खेळ हा माझ्या आयुष्यातील फार महत्त्वपूर्ण घटक आहे. याच कारणामुळे मी इथे खेळाडूंना भेटायला आलो. मी माझ्या करिअरवर सर्वात जास्त प्रेम करतो. पण खेळावरचं प्रेम मला माझ्या बाबांकडून मिळालं. माझ्यामते, मुलांना खऱ्या अर्थाने शिक्षित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. खेळ तुम्हाला ताकद, नियम, शिस्त आणि अनेक संधी उपलब्ध करुन देतात.’