आपण सुचवलेले नाव चित्रपटासाठी न घेतल्याने आलिया भट्ट किंग खानवर नाराज झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात सलमान खान आणि आलियाने शाहरूखचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. दोघांनीही त्याचा फर्स्ट लूकसुद्धा शेअर केला होता. मात्र त्यात चित्रपटाचे नाव जाहीर केलेले नव्हते. त्यामुळे आलियाने शाहरूखच्या या चित्रपटासाठी नाव सुचवलं. नोव्हेंबर महिन्यात केलेल्या ट्विटमध्ये आलियाने लिहिलेलं की, ‘मी सुचवलेले शीर्षक उत्तम आहे. पण तरीही जो कोणी उत्तम शीर्षक सुचवेल त्याला बक्षिस मिळेल.’ त्यावेळी शाहरूखनेही तिने सुचवलेलं नाव यादीत सर्वांत वर ठेवलं होतं. मात्र आलियाने सुचवलेलं नाव किंग खानने आपल्या चित्रपटाला न दिल्याने ती खूप नाराज झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी ‘जब हॅरी मेट सेजल’ हे नाव सोशल मीडियावर जेव्हा ट्रेंड होत होतं तेव्हा आलियाने ट्विटरवरून तिची नाराजी व्यक्त केली. ‘चित्रपटाला मी सुचवलेलं शीर्षक न दिल्याने मी खूप नाराज आहे.’ असं तिने ट्विट केलं. मात्र लगेचच तिने आपली नाराजी दूरही केली. ‘चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तुम्ही खूपच गोड दिसत आहात त्यामुळे मी माझी नाराजी सोडते’, अशा शब्दांत तिने तक्रार मागेही घेतली.

 

आता जेव्हा किंग खानची लाडकी सहकलाकार नाराज असेल तर मग तो तरी कसा शांत बसेल. आलियाची इच्छा पूर्ण करत शाहरूखनेही तिला ट्विटरवर उत्तर दिलं, ‘तुझं शीर्षक मी भविष्यात आपण दोघे मिळून करणाऱ्या चित्रपटासाठी राखून ठेवलंय.’ शाहरूखच्या या उत्तरानेही आलिया खूप खूष झाली. आलियाप्रमाणे रणबीर कपूरनेही चित्रपटासाठी शीर्षक सुचवलं होतं. मात्र ते नावसुद्धा डावलण्यात आलं. चित्रपटाच्या नावाच्या घोषणेनंतर अनेकजण शाहरुख आणि अनुष्काला सिनेमासाठी शुभेच्छा देत होते.

 

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचा इम्तियाज अलीसोबतचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे किंग खान आणि अनुष्काच्या केमिस्ट्रीला इम्तियाजच्या दिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे हा चित्रपट अनेकदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt is upset with shah rukh khan because of jab harry met sajal movie title