‘केबीसी’च्या नव्या पर्वाची धामधूम सांभाळत असतानाच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. २००८ साली आलेल्या ‘भूतनाथ’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये अमिताभ बच्चन पुन्हा एकदा भूताच्या रूपात दर्शन देणार आहेत. एकीकडे या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा पहिला दिवस पार पडत असतानाच ‘केबीसी’च्या सेटवर अमिताभ यांचा ७१ वा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. ११ ऑक्टोबर हा अमिताभ यांचा जन्मदिवस असून यानिमित्ताने ‘केबीसी’च्या सेटवर त्यांना त्यांच्या शंभर वर्षांच्या चाहतीने भेट दिली आहे.
‘केबीसी’च्या सेटवर शंभर वर्षांच्या बर्नादिनी डिसोझा आल्या आणि सत्तरी पार केलेल्या आपल्या लाडक्या हिरोला भेटताच त्या आनंदाने नाचल्या. बर्नादिनी यांना स्मृतिभ्रंशाचा आजार आहे. त्यांना आता काहीही आठवत नाही. पण, अमिताभ बच्चन आणि त्यांचे चित्रपट एवढेच काय ते त्यांना लक्षात आहे. अमिताभ यांचे छायाचित्र पाहिल्याशिवाय बर्नादिनी जेवत नाहीत, अशी माहिती त्यांच्या मुलीने दिली. अमिताभ यांना पाहिल्यावर बर्नादिनी यांनी ओरडून अमिताभ यांचे नाव घेत आपला आनंद व्यक्त केला.