बॉलिवूडच्या महानायकाला पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवू लागला आहे. अमिताभ बच्चन यांना ताप आला असून, पुन्हा एकदा पोटाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. आपल्या आजारपणाविषयी अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट टाकताच त्यांच्या तमाम चाहत्यांकडून सदिच्छा व्यक्त करणारे संदेश यायला सुरुवात झाली.
अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे की, मला ताप आणि पोटाच्या संसर्गाने ग्रासले आहे. घाबरण्यासारखे काहीही नाही. आजचा माझा पूर्ण वेळ यातच जाणार आहे. अमिताभ यांचा हा ट्विट पोस्ट होताच चाहत्यांनी त्यांना आराम करण्याचा, जि-याचे पाणी पिण्याचा आणि खूप सारे पातळ पेय पिण्यासारखे सल्ले देण्यास सुरूवात केली. अमिताभ यांना पोटाचा संसर्ग होण्याची ही पहिलीच वेळ नसून, मागील वर्षी त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली होती. असे असले तरी अमिताभ आपल्या कार्यक्षमतेत जराही खंड पडू देत नाहीत, आज ही ते बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.