बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आहे की अभिनेता सोनू सूद असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आहे. हा थ्रोबॅक फोटो अमिताभ बच्चन यांनी स्वत: त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटासाठी दिलेल्या लूक टेस्टचा आहे.
हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी ‘चित्रपट रेशमा और शेरासाठी केलेला माझा हा लूक.. १९६९.. मी खरं तर या चित्रपटासाठी सिलेक्ट झालो होतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच हसण्याचे इमोजी देखील वापरले आहेत.
अमिताभ बच्चन यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बिग बींच्या या फोटोची तुलना अभिनेता सोनू सूदशी केली जात आहे. एका यूजरने ‘सोनू सूद तुमच्या सारखाच दिसतो’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हा फोटो पाहून कोणाला हा सोनू सूद आहे असे वाटले?’ असे म्हटले आहे. बिग बींचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून ९ लाख लोकांनी लाइक केला आहे.