अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यशैली विराधात जगभरातुन आवाज उठवला जात आहे. विशेषत: साहित्य व अभिनय ही दोन क्षेत्रे या विरोधात आघाडीवर आहेत. दरम्यान जिमी किमेल, मेरिल स्ट्रीप, एलेक बाल्डविन, क्रिसी टायगन, अझीझ अन्सारी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी अमेरिकन प्रशासकीय शैलीचे जाहीर वाभाडे काढले. आणि या यादीत आता अँजेलिना जोली हे नाव देखिल सामील झाले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हॉलिवुड अभिनय क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांपैकी एक म्हणुन ओळखली जाते. परंतु गेल्या काही काळात सामाजीक कार्यात गुंतल्यामुळे ती अभिनयापासून काहीसे अंतर ठेवुन आहे. आणि आता तर तीने थेट राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

बीबीसी वृत्तवाहिनीने घेतलेल्या एका मुलाखतीत तीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक लढवण्यासंबंधीत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तीने निवडणुक लढवण्यास आपण १०० टक्के तयार असल्याचे म्हटले. दरम्यान डोनाल्ड ट्रंपवर तीने जोरदार टिका केली. व त्यांच्यापेक्षाही उत्तम कारभार करण्याची क्षमता आपल्यात असल्याचे म्हटले. २० वर्षांपुर्वी हाच प्रश्न एका वृत्त मासिकाने तीला विचारला होता, तेव्हा तीने राजकारणापासुन आपण चार हात लांब राहणार असल्याचे म्हटले होते. परंतु गेल्या २० वर्षांत तीच्या व्यक्तीमत्वात बरेच बदल झाले आहेत. समाजाबद्दलच्या तीच्या जाणीवा आणखीन तीव्र झाल्या आहेत असे तीचे मत आहे. शिवाय लहानपणापासुनच तीला सामाजिक कार्याची विशेष आवड होती. परंतु अभिनय क्षेत्रात पाउल टाकल्यामुळे ही आवड हळुहळु मागे पडत गेली. आज ती कारकिर्दीच्या उत्तरार्धात आहे. त्यामुळे उर्वरीत आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करण्याचा निर्णय तीने घेतला आहे. आणि यासाठी वेळप्रसंगी सक्रीय राजकारणातही उतरण्याची तयारी तीने केली आहे.