अभिनेता शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २०१९ मधील सर्वाधिक लोकप्रिय आणि सुपरहिट चित्रपट ठरला. तामिळ चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३७२.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे ‘कबीर सिंग’ शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. मात्र ‘या चित्रपटासाठी शाहिद नव्हे तर मला निर्मात्यांची पहिली पसंती होती’, असं अभिनेता अर्जुन कपूरने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘अर्जुन कपूर ‘कबीर सिंग’ या चित्रपटामध्ये काम करण्यास उत्सुक होता. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी शाहिद कपूरला या चित्रपटात घेणार असं वचन दिलं होतं. त्यामुळे अर्जुनला पसंती असतानासुद्धा शाहिदला या चित्रपटामध्ये घ्यावं लागलं.
‘चित्रपटाचे मेकर्स मुराद शेट्टी आणि अश्वीन वर्दे यांनी ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक करण्याचे अधिकार विकत घेतले होते. त्यावेळी त्यांनी प्रथम मला पसंती दिली होती. मात्र त्यावेळी संदीप रेड्डी वांगा यांनी यापूर्वीच शाहिदची भेट घेऊन या चित्रपटासाठी त्याचं नाव निश्चित केलं होतं’, असं अर्जुनने सांगितलं.
पुढे तो म्हणाला, ‘हा चित्रपट संदीप वांगा यांच्याशिवाय अपूर्ण होता. हा चित्रपट करण्यासाठी एक ध्येयवेड्या व्यक्तीची गरज होती. या चित्रपटाची कथा साधी आणि सरळ होती, मात्र तो चित्रपट प्रत्यक्षात साकारण्यासाठी एका ध्येयवेड्याची गरज होती. दिग्दर्शकांनी शाहिदला पहिलेच शब्द दिला होता आणि तो तोडता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी देखील त्यांचा निर्णयाचा आदर केला’.
दरम्यान, ‘या चित्रपटामध्ये शाहिदला घेऊन दिग्दर्शकांची पसंती उत्तम असल्याचं दिसून आलं. शाहिदने यात चांगलं काम केलं आणि चित्रपटाने ३७२.३० कोटी रुपयेही कमवले’, असंही तो म्हणाला. सध्या अर्जुन ‘पानिपत’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तो संजय दत्त आणि क्रिती सेनॉन सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तो ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटातही झळकणार आहे.