उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याला पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. या प्रकरणावर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घाबरुन विकास दुबेने आत्मसमर्पण केलं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – तुफान व्हायरल होणारं ‘हे’ भोजपुरी गाणं तुम्ही पाहिलंय का?

विकास दुबेच्या अटकेच श्रेय अशोक पंडित यांनी योगी आदित्यनाथ यांना दिलं आहे. “योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांसाठी भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. या भीतीमुळेच दुबे सारखे कुख्यात गुंड आपल्या बिळातून बाहेर पडत आहेत. याला आत्मसमर्पण म्हणावं की अटक माहित नाही. पण योगीजींच्या भीतीमुळेच हे शक्य झालं.” अशा आशयाचे ट्विट करुन त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – उज्जैन पोलिसांकडून विकास दुबेला अटक; नेटकऱ्यांनी Memes मधून घेतली UP पोलिसांची फिरकी

उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “विकास दुबे महाकाल मंदिरात जात असताना एका सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखलं आणि पोलिसांना माहिती दिली. चौकशी केली असता त्याने आपली ओळख उघड केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरु आहे”.

गेल्या एक आठवड्यापासून उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेच्या मागावर होते. यासाठी इतर राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेतली जात होती. दरम्यान याआधी पोलिसांनी विकास दुबेच्या तीन सहकाऱ्यांना चकमकीत ठार केलं आहे. यामधील एक सहकारी अमर दुबे याला बुधवारी ठार करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी हमिदपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अमर दुबेला ठार केलं. पोलीस हत्याकांड प्रकरणात अमर दुबेदेखील आरोपी होता. पोलिसांना मोस्ट-वॉण्टेड आरोपींची एक यादी काढली असून यामध्ये अमर दुबेचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं.