Assamese Actor Nandini Kashyap arrested Assam Hit-And-Run Case : गुवाहाटी येथे एका हिट अँड रनच्या प्रकरणात २१ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गुवाहाटी पोलिसांनी आसाममधील चित्रपट अभिनेत्री नंदिनी कश्यापला बुधवारी अटक केले आहे. या अपघाताच्या वेळी नंदिनी ही वाहन चालवत होती असा आरोप आहे.

नेमकं काय घडलं होतं?

२५ जुलै रोजी पहाटे ३ वाजता गुवाहाटीतील दखिंगगाव परिसरात ही दुर्घटना घडली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत समीउल हक या नलबारी पॉलिटेक्निक येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, असे वृत्त हिंदुस्तान टाइन्सने दिले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधून काय समोर आलं?

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये घरी परतत असलेल्या एका २१ वर्षीय विद्यार्थ्याला बोलेरो एसयूव्हीने धडक दिल्याचे आढळून आले होते. हे वाहन ही आसामी अभिनेत्री चालवत होती असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दावा केला के धडक दिल्यानंतर अभिनेत्री विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी थांबली नाही आणि घटनास्थळावरून पळून गेली. जखमी विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याला डोक्याला गंभीर इजा झाली होती आणि पायला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. इतकेच नाही तर विद्यार्थ्याचे हाताची आणि मांड्याची हाडे देखील मोडली होती. तसेच कुटुंबाने आरोप केला की आरोपी अभिनेत्रीने उपचारासाठी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते पण तिने ते पाळले नाही.

हकच्या मित्रांनी एसयूव्हीचा पाठलाग केला आणि काहिलीपारा येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सपर्यंत जाऊन पोहचले. जेथे त्यांनी अभिनेत्रिला जाब विचारला. त्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी तिला अटक केली आणि पानबजार महिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

“बुधवारी पहाटे १:३० च्या सुमारास अभिनेत्रीला अधिकृतपणे अटक करण्यात आली. आम्ही या प्रकरणात भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १०५ जोडले आहे,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक वृत्तसंस्था Gplus शी बोलताना सांगितले.

अटक करण्यापूर्वी कश्यपचे वाहन पोलिसांनी जप्त केले होते आणि या घटनेतील तिच्या कथित भूमिकेबद्दल तिची चौकशी करण्यात आली होती. ज्यामध्ये तिने या घटनेत सहभाग असल्याचे नाकारले होते.