चित्रपटामध्ये एखाद्या लाडक्या कलाकाराची एण्ट्री होताच चित्रपटगृहामध्ये टाळ्या आणि शिट्यांचा आवज ऐकू येतो. पण कोल्हापूरमधील एका चित्रपटगृहामध्ये थोडा वेगळा प्रकार घडला आहे. तान्हाजी चित्रपटातील अजय देवगणची एण्ट्री होताच प्रेक्षकांनी नोटा उधळल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटात अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाला राज्यभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच तान्हाजी चित्रपटाचा चित्रपटगृहामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील अजयच्या एण्ट्रीवर चाहत्यांनी शिट्या आणि टाळ्यांसोबतच नोटा उधळल्या आहेत. हा व्हिडीओ कोल्हापूरमधील पद्मा चित्रपटगृहामधील असल्याचे म्हटले जात आहे.
तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा भव्यदिव्य रुपात मांडण्यात दिग्दर्शक ओम राऊत यांना हिंदीतील पदार्पणात यश मिळाले आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यांमध्ये चांगली कमाई केली आहे. नुकताच हा चित्रपट उत्तर प्रदेश आणि हरयाणामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या दिवशी या चित्रपटाने १०७.६८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.