अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत असून, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुशांतच्या वडिलांची व बहिणीची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले,”सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून, हत्या आहे, आणि त्यावर माझा विश्वास आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सध्या या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयसह ईडीही करत आहे.

आत्महत्या प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सुशांतचे वडील के.के. सिंह व बहीण राणी सिंह यांची फरिदाबाद येथे भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी सुशांतनं आत्महत्या केली नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा केला.

आणखी वाचा- “…हे आधीच केलं असतं तर तर पुरावे नष्ट झाले नसते,” सुशांत सिंह प्रकरणी फडणवीसांची टीका

आठवले म्हणाले,”मला खात्री आहे की, सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झालेला नाही. त्याची हत्या झाली आहे. त्याचं कुटुंब न्याय मागत आहे आणि सध्या सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासावर त्याचे कुटुंबीय समाधानी आहेत,” असं आठवले म्हणाले.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांतच्या वडिलांनी रियावर आरोप केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर सीबीआय, ईडीकडून तिची व तिच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.