अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ ‘बेफिक्रे’ या म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र झळकले. या गाण्यात त्यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली आणि या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता ‘बागी २’च्या निमित्ताने पुन्हा एकदा दिशा- टायगर एकत्र येणार आहेत. ऑनस्क्रीनसोबतच या दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचीही चाहत्यांमध्ये बरीच चर्चा आहे. अनेकदा त्यांना एकत्र पाहिलं गेलं. पण आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असंच दोघांनी नेहमी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलं.

पार्टी, चित्रपट स्क्रीनिंग, पुरस्कार सोहळे आणि इतर कार्यक्रमांमध्येही टायगर- दिशाला एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर दोघांच्या डिनर डेट्सचे फोटोही बऱ्याचदा चर्चेत होते. यामुळे ‘बागी २’चे निर्माते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार टायगर- दिशाच्या केमिस्ट्रीतील नाविन्य हरपेल, अशी भीती निर्मात्यांना वाटत आहे.

वाचा : त्या अभिनेत्रीकडून ‘ऑस्कर’ स्वीकारायला आवडेल- राजकुमार राव

तर दुसरीकडे दिशाने या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. ‘आमच्या एकत्र फिरण्यावर कोणाचाही आक्षेप नाही. या गोष्टींचा चित्रपटावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. माझ्या मते, चांगले कथानक चित्रपटाच्या यशासाठी महत्त्वाचं असतं,’ असं दिशा म्हणाली.
‘बागी २’मध्ये अरमान कोहली, मनोज वाजपेयी, रणदीप हुड्डा आणि प्रतीक बब्बर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साजिद नाडियादवाला निर्मित आणि अहमद खान दिग्दर्शित ‘बागी’चा हा सिक्वल असून २७ एप्रिल २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.