छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. या शोच्या प्रत्येक पर्वामध्ये कलाविश्वातील सेलिब्रिटी सहभागी होत असतात. सध्या या शोचं १३ वं पर्व सुरु आहे. यंदाच्या पर्वामध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी सहभाग घेतला आहे. यात सिद्धार्थ शुक्ला,रश्मी देसाई,मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंह या कलाकारांचा समावेश आहे. बिग बॉसचं नवीन पर्व सुरु होण्यापूर्वी त्यात सहभागी कलाकारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये बऱ्याच वेळा कोणते कलाकार सहभागी होणार याविषयी चर्चा रंगते. यात बऱ्याचदा अभिनेता शरद केळकरचं नावदेखील येतं. मात्र अनेकदा बिग बॉसच्या ऑफर येऊनदेखील त्याने त्या नाकारल्या आहेत. त्यामागचं कारणं शरदने नुकतंच सांगितलं आहे.
का नाकारल्या शरदने बिग बॉसच्या ऑफर्स?
“बिग बॉसच्या प्रत्येक नव्या पर्वात सहभागी होण्यासाठी मला ऑफर येत असते. मात्र मी दरवेळी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी नकार देतो. मला माझं वैयक्तिक आयुष्य साऱ्यांसमोर दाखवणं आवडत नाही. तसंच मी जसा आहे तसाच चाहत्यांसमोर जाणं मला पसंत आहे. उगाच चाहत्यांसमोर खोटं वागणं मला पसंत नाही. मी २४ तास सतत खोटं वागू शकत नाही आणि मला तसं व्हायचंही नाही”, असं शरदने सांगितलं.
वाचा : बंगला नव्हे राजमहाल; पाहा कसा दिसतो बिग बींचा ‘जलसा’
