कला आणि क्रीडा जगतात सध्याच्या घडीला सर्वांच्याच नजरा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीवर खिळल्या आहेत. अनुष्का-विराटचं नातं आता सर्वज्ञात असून, त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी केली जातेय याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, तोपर्यंत विरुष्काचे काही फोटो पाहूनच तुम्हाला समाधान मानावं लागेल. नुकताच अनुष्काचा वाढदिवस झाला.
अनुष्काच्या वाढदिवसाच्याच दिवशी विराटच्या संघाचा आयपीएल सामना असल्यामुळे त्या दिवशी काही त्याला अनुष्काचा वाढदिवस साजरा करता आला नाही. पण, त्यानंतर मात्र या दोघांनाही मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. त्यामुळे हे ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ नेमकं कुठे गेलंय याविषयीच अनेकजण तर्क लावत आहेत. याच तर्कवितर्कांच्या वातावरणात ‘विरुष्का’चा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतील हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.
विराट-अनुष्का शर्मा यांच्या नात्यात असणारी सहजता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद या फोटोमध्ये पाहायला मिळतो. त्यांच्याव्यतिरिक्त या फोटोमध्ये बंगळुरु संघातील स्टार खेळाडू एबी डी’व्हिलियर्ससुद्धा दिसतो. विराट-अनुष्काने एखाद्या कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत बऱ्याच कार्यक्रमांना या दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे.