|| रेश्मा राईकवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हरतऱ्हेचा संघर्ष करावा लागला. या धगधगत्या घटना इतिहासात काही पानांमधून शब्दांकित झाल्या आहेत, मात्र अन्यायाची ती धग ज्यांनी सोसली त्यांच्या मनावरच्या जखमा शतकाचा काळ उलटला तरी मिटलेल्या नाहीत. १९१९ साली अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत निषेध सभा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर जनरल डायरच्या आदेशाखाली ब्रिटिश सैनिकांनी बंदुकीच्या सोळाशे फै री झाडल्या. हजारोंचे बळी, प्रेतांचा खच, कितीतरी जखमींच्या विव्हळयातना या सगळ्याची आपण फक्त कल्पना करू शकतो. या निर्घृण रक्तसंघर्षाने केवळ एक उधम जन्माला घातला असं नाही… हत्याकांडापासून ते १९४० मध्ये या हत्याकांडाला खऱ्या अर्थाने जबाबदार असलेल्या पंजाबच्या तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर मायके ल ओ डायर याच्या हत्येपर्यंत घडलेल्या अनेक गोष्टींचा पट ‘सरदार उधम’मधून उलगडतो. त्या अस्वस्थ इतिहासाचा पट मांडताना वर्तमानाशी त्याला जोडण्याचा दिग्दर्शक शूजित सिरकार यांनी प्रयत्न केला आहे.

‘सरदार उधम’ हा रूढार्थाने चरित्रपट नाही, असे चित्रपटाआधी येणारे निवेदन स्पष्ट करते. एकाअर्थी हे तितके च खरे आहे. सरदार उधम सिंग यांच्या आयुष्याबद्दलची संपूर्ण माहिती या चित्रपटातून उलगडत असली तरी त्यांची कथा सांगणं हा या चित्रपटाचा हेतू नाही. जालियनवाला हत्याकांड जवळून अनुभवणाऱ्या, अंधाऱ्या रात्री सगळीकडे पसरलेल्या रक्ताच्या सड्यातून कोणी जिवंत राहिलं आहे का याचा शोध घेत त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणाऱ्या अनेकांमध्ये उधम सिंग नावाचा कोवळा तरुण होता. मृत्यूचं त्या काळरात्रीत अशा पद्धतीने झालेलं दर्शन उधमच्या मनावर जणू कोरलं गेलं. त्या घटनेने त्याची झोप कायमची उडाली, एक  अस्वस्थता त्याच्या मनाला आयुष्यभरासाठी जोडली गेली. उधमच्या मनातील या अस्वस्थतेला दिशा देण्याचं काम भगतसिंग यांच्या मैत्रीने केलं. भगतसिंग यांना झालेली फाशी, त्यानंतर त्यांनी क्रांतिकारकांना जोडून केलेल्या ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ (एचएसआरए) या संघटनेतील कार्यकर्त्यांना पकडून ठार मारण्यात आलं. पंजाबमधील एचएसआरएने उभारलेली चळवळ मोडीत काढली गेली. या सगळ्या घटनांमधून तावून सुलाखून बाहेर पडलेला उधम सिंग नावाचा तरुण या हत्याकांडाला खऱ्या अर्थाने जबाबदार असलेल्या मायकेल ओ डॉयर नामक सैतानी डोक्याला ठार करण्याचा विचार तब्बल २१ वर्षे उराशी बाळगून प्रयत्न करत राहातो. ते प्रत्यक्षात आणताना तो डॉयरच्या या कृतीमागचे विचार, भावनाही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. डॉयरच्या हत्येच्या पूर्वतयारीचा भाग आणि हत्येनंतर उधम सिंगला फाशी मिळेपर्यंतचा भाग अशी ढोबळमानाने या चित्रपटाची विभागणी करता येईल. मात्र या दोन घटनांमध्ये गेलेला काळ आणि त्या दरम्यान घडलेल्या अगदी छोट्यातल्या छोट्या घटनाही पटलावर ठेवत दिग्दर्शक खूप काही सांगू पाहातो, जाणवून देऊ पाहातो.

दिग्दर्शक शूजित सिरकार यांच्या चित्रपटांची शैली अद्यापपावेतो प्रेक्षकांच्या परिचयाची झाली आहे. एखादा विषय खूप हळुवारपणे वेळ घेत मांडण्याची त्यांची शैली याही चित्रपटात दिसून येईल. ‘सरदार उधम’ पाहताना मात्र ताणलेल्या वेळेचं हे गणित प्रेक्षकांच्या मनाची पकड अधूनमधून घालवून बसतं. एकाच चित्रपटात खूप काही उलगडून सांगण्याच्या नादात चित्रपटाचा तोल काही ठिकाणी बिघडला आहे हे नक्की. सुरुवातीचा जवळजवळ एक-सव्वा तास आपण फक्त उधम सिंग यांनी लंडनमध्ये जाण्यासाठी केलेली धडपड आणि डॉयरपर्यंत पोहोचण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न पाहात असतो. यातही भूतकाळात जाऊन गोष्ट सांगताना त्यातही पुन्हा एक भूतकाळ आपल्यासमोर येतो. हे सतत या काळातून त्या काळात येणं-जाणं आणि प्रसंगांची, त्यातून दिग्दर्शकाला नेमकं  काय सांगायचं आहे याची जोड लावताना प्रेक्षकांची प्रचंड दमछाक होते. संपूर्ण चित्रपटभर असलेला एकाच रंगाची गडद छाया आणि विषयाचं गांभीर्य यामुळे हा चित्रपट मनोरंजनात्मक नाही याची जाणीव पहिल्या काही मिनिटांतच प्रेक्षकांना होते. त्यामुळे अडीच तासांपेक्षा लांबलचक चित्रपटात वेगवेगळ्या पातळीवर त्यातलं गांभीर्य समजून घेऊन त्याच्याशी जोडलेलं राहाणं हे प्रेक्षकांसाठीही सोपं राहिलेलं नाही. त्यातल्या त्यात मधल्या मध्ये उधम आणि त्याची प्रेयसी यांच्यातील हळुवार अगदी काही सेकंदांसाठी येणारे प्रसंग किंवा भगतसिंग आणि उधम यांच्यातील मैत्री, त्यांच्या एकत्रित कामाचे प्रसंग हे शब्दश: रंग भरतात. प्रेक्षकांना त्या क्षणांमध्ये काहीएक दिलासा मिळतो. विशेषत: भगतसिंग यांनी मांडलेले विचार आजच्या काळात खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहेत. अन्यायाच्या विरुद्ध लढताना आपला दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असू शकत नाही, सांप्रदायिक विचार वा जातीय विचारांना त्यात थारा दिला जाऊ शकत नाही, हा विचार भगतसिंगांनी साथीदारांसमोर स्पष्टपणे ठेवला आहे. असे अनेक प्रसंग क्रांतिकारी आणि त्यांच्या संघर्षामागची मानसिकता स्पष्ट करतात.

चित्रपटाचा उत्तरार्ध हा अंगावर येणारा आहे. चित्रपटाच्या शेवटी उधम सिंग यांची चौकशी करणारा गुप्तहेर अधिकारी स्वेन त्याला डॉयर यांच्या हत्येचं खरं कारण विचारतो. कधीही कुठलीही हिंसा न करणाऱ्या उधमने एका क्षणी बंदूक घेऊन डॉयरसह इतरांवर चालवली. असं काय घडलं त्या एका क्षणात, या प्रश्नाचं उत्तर देताना त्या क्षणाला जोडणारा जालियनवाला हत्याकांडाच्या काळ्याकुट्ट रात्रीचा पट उधम स्वेनसमोर ठेवतो. थंड डोक्याने, कर्तव्याच्या नावाखाली डॉयरने चालवलेल्या बंदुकीच्या फै री आणि बंड मोडून काढून धडा शिकवण्याच्या इराद्याने जनरल डायरला हाताशी धरत मायकेल डॉयर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घडवलेले हत्याकांड आपलं काळीज चिरत जातं. बंद पुस्तकातल्या इतिहासाची धग तेव्हा खऱ्या अर्थाने जाणवते. उधम सिंग यांच्या त्या एका कृतीमागचं कारण उलगडून सांगताना दिग्दर्शकाने का खटाटोप केला असेल याची जाणीव या उत्तरार्धात प्रकर्षाने होते. कायद्याच्या नावाखाली एका देशाने दुसऱ्या देशातील लोकांवर केलेल्या या गुन्ह्यासाठी आजपर्यंत माफी मागितली गेली नाही की त्या रक्तरंजित अन्यायाचं परिमार्जन केलं गेलं नाही. हा मुद्दा दिग्दर्शकाने चित्रपटातून अधोरेखित केला आहे. सरदार उधम साकारताना त्याच्या प्रत्येक टप्प्यावरचे शारीरिक आणि मानसिक बदल अगदी बारीक तपशिलांसह अभिनेता विकी कौशलने रंगवले आहेत. चित्रपटात अनेक परदेशी कलाकार आहेत, त्या गर्दीत संपूर्ण चित्रपट तोलून धरण्याची जबाबदारी विकी कौशलने लीलया पेलली आहे. भगतसिंगच्या भूमिकेत अभिनेता अमोल पराशरचा चेहरा ताजेपणा देऊन जातो.

‘सरदार उधम’ हा खऱ्या अर्थाने दिग्दर्शक शूजितचा चित्रपट आहे. अस्वस्थ इतिहासाचा पट मांडताना क्रांतिकारकांचा राष्ट्रवाद कसा होता याबद्दल स्पष्ट भाष्य करत वर्तमानावर बोट ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न दिग्दर्शकाने के ला आहे.

सरदार उधम

दिग्दर्शक – शूजित सिरकार

कलाकार – विकी कौशल, अमोल पराशर, शॉन स्कॉट, स्टीफन होगन, बनिता संधू, रितेश शाह.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: British independence to india event amritsar in the garden of jallianwala general dyer by british troops akp