मराठी भाषा किती गोड असते हे परत एकदा सिद्ध झालं. मुळची कॅनडीयन असलेल्या ‘पॉला मॅकग्लिन’ हीने तसं सिद्ध ही करून दाखवलं आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “पिंडदान” या मराठी चित्रपटासाठी तिने सिद्धार्थ चांदेकर आणि मनवा नाईक बरोबर एकत्रित काम केलं आहे. मराठीमध्ये परदेशी कलाकारांची एन्ट्री नवी नाही. पण मुळात परदेशी कलाकारांच्या अश्या प्रमुख भूमिकेत काम करण्याने मराठीसृष्टीत एक नवं चैतन्य लाभलं आहे. यासाठी हे परदेशी कलाकारसुद्धा तितकीच मेहनत ही घेताना दिसत आहेत.
हेच बघाना ! पॉला ही मुळची कॅनडीयन असली तरी तिने मराठी भाषा शिकण्यासाठी तितकीच मेहनत देखील घेतली. देवनागरी भाषेतील उच्चार स्पष्ट व्हावे यासाठी तिने गायत्री मंत्राचा जप सुरु केला. फक्त गायत्री मंत्राचा जप न करता त्या मागचा अर्थ ही तिने जाणून घेतला. ‘कोणतीही गोष्ट शिकताना त्या मागील अर्थ मी आधी जाणून घेते मगच ती आत्मसाद करायला मला सोपी जाते’, असं ती म्हणाली. खरतर इतकी मेहनत एका परदेशी कलाकारांकडून फारशी अपेक्षित नसते . कारण इथे बऱ्याच हिंदीतल्या अभिनेत्यांची मराठीत बोलताना बोबडी वळते. तिथे पॉलाची ही मेहनत वाखाण्याजोगी आहे.
पॉलाने या चित्रपटात अॅना नावाच्या ब्रिटीश मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. जी काही कारणानिमित्त महाराष्ट्रात येथे आणि इकडचीच होऊन जाते. तिला हा देश आणि येथील संस्कृती याची उत्सुकता लागलेली असते त्यामुळे भारतात आल्यावर ती सर्व रूढी आणि परंपरा शिकते. ‘अभिनय करता करता मला कधी ही संस्कृती आपलीशी वाटू लागली हे माझ मला देखील कळल नाही’, असं ही ती म्हणाली. सुरुवातीला मी जेव्हा चित्रपटाचे संवाद वाचले तर ते मराठीत होते. ते मी आधी इंग्लिशमध्ये लिहिले आणि मग वाचू लागले.संवाद बोलताना शब्दांचे उच्चार कसे असावेत याबद्दलच मार्गदर्शन मला वेळोवेळी माझ्या दिग्दर्शकांकडून, मित्रांकडून आणि सह-कलाकरांकडून मिळत गेलं. त्यांच्या मदतीमुळेच मी कॅमेरासमोर न डगमगता संवाद बोलू शकले, असं तीने सांगितलं.
बंटी प्रशांत या नव्या जोडीने दिग्दर्शित केलेल्या ‘पिंडदान’ या चित्रपटाच बरचसं शुटींग ‘फलटण’ तालुक्यात झाल आहे. चित्रपटाचा काहीसा भाग हा फलटण मधील पेशवे कालीन राजवाड्यात झाला आहे. याआधी फलटण मधील एका राजवाड्यात हिंदीत खूप गाजलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं,त्यामुळे फलटण तालुक्यात असलेल्या पेशवे कालीन राजवाडे आणि वास्तूंची एक प्रकारची भुरळच जणू पॉलाला पडली. त्या वास्तूंबद्दलची संपूर्ण माहिती पॉला चित्रिकरणादरम्यान सतत विचारून घेऊ लागली, असे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत पाटील म्हणाले. अशा या पॉलाची मराठी भाषा शिकण्याची आणि समजून घेण्याची ही ओढ पाहिली तर मराठी बोलण्यास इतकं अवघड नाहीये, हे अमराठी लोकांना नक्कीच पटेल.
त्यामुळे अतिशय चकचकीत आणि उत्तम दर्जाचं प्रॉडक्शनअसंच मी ‘पिंडदान’चं वर्णन करेन,’ असंही ती म्हणाली. ‘बंटी प्रशांत यांच्याबरोबरच सिद्धार्थ चांदेकर,मनवा नाईक अशा कलाकारांसह काम करण्याचा अनुभव फारच धमाल होता. परदेशी कलाकारांना हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपटांत महत्त्वाची भूमिका सहसा मिळत नाही. गाण्यात नाचण्यासाठी किंवा छोट्या भूमिकांसाठी परदेशी कलाकार घेतले जातात. मात्र, पिंडदानसारख्या अप्रतिम चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारायला मिळणं माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट आहे,’ असं तिनं सांगितलं.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2016 रोजी प्रकाशित
‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ कॅनेडियन पॉला चा मराठी बाणा
देवनागरी भाषेतील उच्चार स्पष्ट व्हावे यासाठी तिने गायत्री मंत्राचा जप सुरु केला.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 07-05-2016 at 12:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canadian paula mcglynn in marathi movie pindadaan