काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता पर्ल व्ही पुरीला अटक झाली. त्यानंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे काही कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला तर काहींनी त्याच्यावर टीका केली. दरम्यान अभिनेत्री निया शर्मा आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. आता निया शर्माने देवोलिना भट्टाचार्जीची माफी मागितली आहे.

नियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तिने माफी मागितली आहे. ‘माझी आई, भाऊ आणि मित्र रवी यांनी मला माझ्या चुकीची जाणिव करुन दिली. त्या तिघांच्या मताचा मी आदर करत देवोलिना तुझी माफी मागते. तेव्हा मला प्रचंड राग आला होता. मला आशा आहे की तू नक्की मला माफ करशील’ असे नियाने देवोलिनाची माफी मागताना म्हटले आहे.

त्यानंतर देवोलिनाने नियाच्या या पोस्टवर लगेच उत्तर दिले आहे. ‘माझ्याकडूनही काही चूक झाली असेल तर माफ कर. तुझी आई, भाऊ आणि मित्र रवी यांचे मनापासून आभार, सुरक्षित रहा आणि घरात रहा’ असे देवोलिनाने म्हटले.

काय आहे प्रकरण?

देवोलिनाने पर्लची बाजू घेणाऱ्या कलाकारांना सुनावले होते. या कलाकारांच्या यादीमध्ये निया शर्मा देखील होती. पण नियाने लगेच देवोलिनाची खिल्ली उडवत ट्वीट केले होते. ‘दीदीला कोणी तरी जाऊन सांगा आता कँडल मार्च करु शकत नाही. कारण करोना माहामारी आहे. तसेच ते विचित्र डान्स रिल्स बनवण्यापूर्वी सराव करण्याची अत्यंत गरज आहे’ या आशयाचे ट्वीट नियाने केले होते. त्यानंतर देवोलिना देखील शांत बसली नाही तिने नियाला सुनावले होते. त्या दोघींमधील भांडण सोशल मीडियावर चर्चेत होते.

४ जूनला पर्लसह ६ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पास्को कायद्या अंतर्गत सर्व आरोपींवर बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पर्लवर कारवाई करण्यात आल्यानंतर एकता कपूरने एक पोस्ट शेअर करत पर्ल निर्दोष असल्याचं म्हंटलं आहे. तर करिश्मा तन्नाने देखील पर्लला पाठिंबा दिला.