स्टारने आपली प्रत्येक छोटी गोष्ट फेसबुक/ ट्विटरवर पोस्ट करून मीडिया व फॉलोअर्स यांच्याशी कनेक्ट राहायला हवेच का अथवा सोशल नेटवर्किंग साइटवरील स्टारच्या पोस्ट पुन्हा वेगळी बातमी कशी ठरेल असे प्रश्न अधूनमधून चर्चेत असतात. पण स्टारने नवीन गाडी घेतलीय यापासून तो देशविदेशात कुठे बरे भटकंतीला गेलाय या प्रत्येकाला ‘न्यूज व्हॅल्यू’ असल्यानेच त्या पोस्ट ही गरज आहेच. स्टारची जवळपास कोणतीच गोष्ट खासगी राहत नाही, याची सवय याच स्टार्सनी लावलीये की गॉसिप्स/ग्लॅमर वृत्तीने हा प्रश्नच आहे आणि डिजिटल माध्यमा पलीकडेही खूपच मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्यापर्यंत स्टारच्या घडामोडी पोहोचायला हव्यात. सध्या एक महत्त्वपूर्ण नवीन गोष्ट पुढे येतेय. ती म्हणजेच सोशल नेटवर्किंग साइटवरील फॉलोअर्सइतकेही प्रेक्षक चित्रपटगृहात का लाभत नाहीत? हे फॉलोअर्स त्या स्टारच्या लूक व स्टाइलवर फिदा आहेत. चित्रपट पाहणे ही गोष्ट तेथे येत नाही ? की चित्रपट चालवणारा वर्ग वेगळाच आहे? तो अजूनही फारसा सोशल साइट्सवर कनेक्टेड नाही? अमिताभच्या फॉलोअर्सनी ‘सरकारराज 3’ एकदा पाहिला असता तरी तो सुपर हिट चित्रपट ठरला असता. पण सोशल साइटवर फॉलोअर्स असणे वेगळे व चित्रपटाला त्याच्या क्लासप्रमाणे स्वीकारणे/ नाकारणे वेगळे अशीच या फॉलोअर्सची मानसिकता/ दृष्टिकोन दिसतोय. राजेश खन्नादेखील यातून सुटला नाही. त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळावर प्रचंड गर्दी होई पण म्हणून प्रेम कहानी, मेहबूबा या चित्रपटाना त्यानी स्वीकारले नाही. सलमान खान, शाहरुख खान यांच्या बंगल्याबाहेरची ‘फॅन्स’ची गर्दी हे प्रेम वेगळे आणि त्यांच्या ‘ट्यूबलाइट’, ‘जब हॅरी मेट सेजल’ला नाकारणे वेगळाच विषय. सोशल नेटवर्किंग साइटवरील वाढत्या फॉलोअर्सबाबतही तेच म्हणायचे काय? की या प्रेमाचा स्वीकार करून स्टार्सनी आपल्या पोस्टचे प्रमाण व उत्साह वाढवावा? तेच टॉनिक ठरतंय तर तेच करावे कारण तेच टॉनिक चित्रपटात भूमिका करण्यास शक्ती देते.
चाहते असो अथवा फॉलोअर्स कधी कधी त्यांच्या प्रेमाचा अतिरेक/ अतिउत्साह होतोच. जुहूच्या रस्त्यावर ‘नाचे नागिन गली गली’च्या गाण्याचे चित्रीकरण असतानाच अशाच एका चाहत्याचा संयम सुटला आणि त्याने चक्क मीनाक्षी शेषाद्रीला अशोभनीय पद्धतीने पकडले. या अनपेक्षित अनुभवाने ती प्रचंड हादरली आणि दोन तीन दिवस शूटिंग करु न शकल्याचे वृत्त गाजले. नेहा पेंडसेलाही सोशल साइटवर वात्रट/अश्लील कॉमेन्टसचा मानसिक त्रास झाल्याचे मध्यंतरी वृत्त होते. अनेकदा तरी या अभिनेत्रींना सोशल साइटवर भलतीसलती विचारणा वा प्रश्न होतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पोस्ट टाकत राहणेच योग्य असले तरी याबाबत सतत एक अनामिक दबाव राहू शकतो. सार्वजनिक स्थळावरील अवाजवी गर्दीतून संरक्षण द्यायला पोलीस वा बाऊन्सर आहेत, तसे सोशल साइटवर बचाव कार्य कोण करणार? वाढती माध्यमे एक्स्पोजर वाढवणारी व चाहत्यांशी थेट नाते जोडणारी असली तरी आपले फॉलोअर्स ठरवायचा अथवा त्यांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार कोणत्याच कलाकाराकडे नाही. पण अधिकाधिक फॉलोअर्स अनेक स्टारचा उत्साह वाढवतो. काय सांगावे एखादी अभिनेत्री, माझेच फॉलोअर्स सर्वात जास्त हे टेचात सांगेलही. स्पर्धेच्या युगात ही भावना विलक्षण प्रबळ होणारी आहे. हा या सार्याचा वेगळाच पैलू ठरावा…
– दिलीप ठाकूर