सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीने तिच्या पतीपासून अखेर घटस्फोट घेतला. सौंदर्या आणि अश्विन यांच्या नात्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं. सरतेशेवटी कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता ते कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. त्यांच्या नात्यात आलेलं हे वळण पाहता आता चित्रपटसृष्टीमध्ये पुन्हा एकदा विभक्त झालेल्या सेलिब्रिटी जोडप्यांच्या चर्चा सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. झगमगाटाच्या या विश्वात कलाकारांची नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने त्यांच्या नात्यात काही अनपेक्षित वळणं येतात. काही नाती तर अगदी टोकाशी जाऊन त्यांना कडाही जातो.
वाद, गैरसमजुती, अहम, फसवणूक आणि विवाहबाह्य प्रेमप्रकरणं अशा बऱ्याच कारणांनी आजवर अनेक सेलिब्रिटी जोडप्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच अशा सेलिब्रिटींच्या घटस्फोटांच्या बातम्या समोर आल्यावर प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या होत्या.
हिमेश रेशमिया, कोमल-
जवळपास २२ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर संगीतकार, गायक हिमेश रेशमियाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनाही स्वयं नावाचा एक मुलगाही आहे. मुख्य म्हणजे हिमेश आणि त्याच्या पत्नीने आपण दोघंही एकमेकांना अनुरुप नसल्याचं कारण देत वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. तर काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घटस्फोटामागे टेलिव्हिजन अभिनेत्री सोनिया कपूरचं नाव पुढे येत होतं. सोनिया आणि हिमेश रिलेशनशिपमध्ये असल्यामुळेच त्याच्या वैवाहिक जीवनात हे वादळ आल्याचं म्हटलं जात होतं.
वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…
मलायका अरोरा, अरबाज खान-
१९९८ मध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनीसुद्धा एकाएकी त्यांचं हे नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने अनेकांनाच धक्का बसला होता. कलाविश्वातही मलायका- अरबाजचा घटस्फोट बराच चर्चेत राहिला. १८ वर्षांचं वैवाहिक नातं एका वळणावर आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. पण, घटस्फोटानंतरही त्यांच्यातील मैत्रीचं नातं आजही कायम आहे. विविध कौटुंबिक कार्यक्रमामध्येही ते अगदी सहजतेनं वावरतात. घटस्फोटानंतर मलायकाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं होतं. तर, अरबाजही एका मॉडेलला डेट करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.
फरहान अख्तर, अधुना भबानी-
सेलिब्रिटी जोडप्यांमध्ये आणखी एक बहुचर्चित जोडपं म्हणजे फरहान अख्तर आणि अधुना भबानी. १६ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनीही सामंजस्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्यात दुरावा येण्याचं नेमकं कारण आजतागायत समोर आलं नाहीये. सध्या फरहान आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चा आहेत.
करिष्मा कपूर, संजय कपूर-
अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही वर्षांपासून अस्थैर्य पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नात्यात आलेल्या दुराव्यामुळे करिष्मा आणि तिचा पती संजय कपूर या दोघांनीही त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नात्याच्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर करिष्मा आणि संजय या दोघांचीही नावं कोणा दुसऱ्याच व्यक्तींसोबत जोडली गेली. संजय कपूरने त्याच्या प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकत नव्या प्रवासाला सुरुवातही केली. तर करिष्मासुद्धा तिच्या तथाकथित प्रियकरासोबत म्हणजेच संदीप तोष्णीवालसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.