शनिवारची पहाट ही प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात उमेदीची आणि नव्या आशांची होती. निमित्तंही तसंच होतं. साऱ्या विश्वात भारताच्या कामगिरीकडे लक्ष कागून राहिलेलं होतं, जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै या दिवशी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेलं “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचलं. पण, काही तांत्रिक बिघाड झाले आणि विक्रम लँडरचा संपर्क तुटला. प्रचंड आशा आणि अपेक्षांच्या या वातावरणात या प्रसंगाचा सामना करावा लागल्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्नही अनेकांच्याच मनात घर करुन गेला.

एका अर्थी ही मोहिम अंतिम टप्प्यात आल्यावरच असं घडणं हे अनपेक्षित होतं. पण, तरीही वास्तवाला सामोरं जात अपयशही इस्रोच्या सर्वच वैज्ञानिकांनी मोठ्या सकारात्मकतेने पदरात घेतलं. यात त्यांना अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांचाच पाठिंबा मिळाला.

अभिनेता रितेश देशमुख, अमुपम खेर, आर. माधवन, शेखर कपूर आणि अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्रोच्या चांद्रयान मोहिमेविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ‘गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले!!!’, असं म्हणत अनुपम खेर यांनी आपण या क्षणी इस्रोच्याच बाजूने उभं असल्याची प्रतिक्रिया दिली. भविष्य हे खऱ्या अर्थाने त्यांचंच असतं, जे स्वप्नांवर विश्वास ठेवतात. आपण, या प्रसंगाचाही सामना करु. इस्रोच्या संपूर्ण टीमचा मला प्रचंड अभिमान आहे. आज आपण जे काही संपादन केलं हीसुदधा काही छोटी बाब नव्हती, असं लिहित रितेश देशमुखने त्याचा देशाभिमान व्यक्त केला.

अभिनेता आर. माधवन यानेही इस्रोच्या या कामगिरीला ऐतिहासिक ठरवत संपूर्ण टीमचं कौतुक केलं. सोबतच त्याने ‘ऑल इज वेल….’म्हणत परिस्थितीविषयी आपल्या संमिश्र भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

इस्रोच्या वैज्ञानिकांसोबत या मोहिमेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोप्रमुख आणि त्यांच्या संपूर्ण चमूच्या प्रयत्नांची प्रशंसा करत आतापर्यंतच्या कामगिरीसाठी त्यांना दाद दिली.

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला होता. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला.