बॉलीवूड अभिनेता इरफान खान याने बक-याची कत्तल म्हणजे कुर्बानी होत नाही असे म्हणून वादाला तोंड फोडले होते. मुस्लिमांनी काहीतरी त्याग करण्याची परंपरागत पद्धत म्हणजे कुर्बानी असल्याचे त्याने म्हटलेले. यानंतर मुस्लिम धर्मगुरुंकडून इरफानवर टीका करण्यात आली. धार्मिक विधींबाबत स्वतःचे तर्कवितर्क लावण्यापेक्षा त्याने स्वतःच्या कामाकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी टिप्पणी मुस्लिम धर्मगुरुंनी केली होती.
धर्मगुरुंच्या या वक्तव्यानंतर इरफानने आपली बाजू मांडण्यासाठी काही ट्विट केले आहेत. त्यात त्याने आपण धर्मगुरुंना घाबरत नसल्याचे सांगत मी धर्माचा ठेका घेतलेल्यांच्या देशात राहत नाही. माझ्या वक्तव्यामुळे जे दुःखी झाले आहेत, ते स्वतःचे आत्मविश्लेषण करण्यास तयार नाहीत किंवा त्यांना निष्कर्षापर्यंत पोहचायचे नाही. माझ्या मते धर्म म्हणजे वैयक्तिक आत्मपरीक्षण आहे. आपल्याला दया, ज्ञान आणि स्वनियंत्रण मिळवण्याचा धर्म हा एक स्रोत आहे.
कुर्बानीचा अर्थ एखाद्या बक-याचा किंवा मेढींचा बळी देणे नसून तुम्ही तुमच्या जवळच्या गोष्टीचा त्याग करणे असा होतो. तुम्ही ज्या गोष्टीचा त्याग करत आहात त्याच्याशी तुमची जवळीक असली पाहिजे. निष्पाप प्राण्यांचा बळी देऊन तुमचा हेतू पूर्ण होणार नाही. गेल्या काही काळापासून आपण या धार्मिक विधींचा मूळ अर्थ समजून न घेता केवळ त्या विधी पूर्ण करण्याच्या मागे लागलो आहोत, असे इरफानने म्हटले होते. त्यावर इरफानने कोणत्या तरी धर्मगुरूशी चर्चा करून थोडे ज्ञान संपादन करावे आणि मगच कुर्बानी अथवा रमजानबद्दल बोलावे, असे काझी खालिद उस्माई म्हणाले होते.